खळबळजनक! मरण्यासाठी सोपा उपाय काय? असे गूगल वर सर्च करणाऱ्यांच्या संख्येत वाढ; युवकांना समुपदेशनाची गरज

खळबळजनक! मरण्यासाठी सोपा उपाय काय? असे गूगल वर सर्च करणाऱ्यांच्या संख्येत वाढ; युवकांना समुपदेशनाची गरज

बुलडाणा (राज धनवे- बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा कव्हरेज या आपल्या बुलढाण्यातील प्रसिद्ध मराठी न्यूज पोर्टलवर आम्ही नेहमीच तुमच्यासाठी उपयुक्त आणि माहितीपूर्ण लेख घेऊन येतो. त्यामुळेच आमच्या वाचकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पण, नुकतेच आम्ही आमच्या वेबसाइटच्या गुगल सर्च कन्सोल डेटावर नजर टाकली असता, काही खळबळजनक गोष्टी आमच्या लक्षात आल्या. यापूर्वी आम्ही “मच्छर मारण्यासाठी घरगुती उपाय” या विषयावर एक लेख लिहिला होता, जो तुम्ही गुगलवर संबंधित कीवर्ड्स टाकून शोधू आणि वाचू शकता.

पण, आज आम्हाला काही नवीन आणि थोडे चिंताजनक कीवर्ड्स दिसले, जे लोक गुगलवर सर्च करत आहेत. यामध्ये “मरण्यासाठी सोपा उपाय”, “मरण्यासाठी सोपी आयडिया”, “फाशी कशी घ्यायची?”, “मरण्यासाठी कोणते औषध आहे?”, आणि “लवकर मरण्यासाठी काय करू?” अशा प्रकारचे शब्दप्रयोग समोर आले. आणि या कीवर्ड्सच्या सर्चमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसत आहे, त्यामुळे हे पाहून आम्हाला खूप चिंता वाटली. कारण, हे दर्शवतं की काही लोक मानसिकदृष्ट्या खूप तणावाखाली आहेत. त्यांच्यासाठीच हा लेख!

मित्रांनो, आयुष्य इतकं स्वस्त नाही की आपण गुगलवर असे उपाय शोधून आपली जीवनयात्रा संपवावी. खरं सांगायचं तर, आयुष्य हे खूप सुंदर आहे. हो, कधी कधी संकटे येतात, अडचणी येतात, पण त्याचा अर्थ असा नाही की मृत्यू हाच एकमेव पर्याय आहे. उलट, या संकटांमधून बाहेर येण्यासाठी आणि नवीन सुरुवात करण्यासाठी अनेक मार्ग खुले आहेत. जीवन खूप सुंदर आहे, फक्त ते योग्य पद्धतीने जगता आले पाहिजे. आपल्या मनातील भीती आणि निराशेला जिंकून नव्या संधी शोधण्याची गरज आहे.

याउलट आपण गुगलवर “जगण्यासाठी सोपे उपाय” किंवा “आयुष्याला नवीन दिशा कशी द्यावी” असे सर्च केले, तर आपल्याला खूप काही नवीन शिकायला मिळेल. प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग असतोच, फक्त तो शोधण्याची गरज आहे. आणि हा मार्ग शोधण्यासाठी तुम्ही एकटे नाही आहात! मरण्यासाठी एखादा सोपा उपाय असू शकतो, पण जगण्यासाठी हजारो उपाय आपली वाट पाहत आहेत.

मित्रांनो, जीवनात अनेक संधी आणि शक्यता दडलेल्या असतात. कधी कधी आपल्याला वाटतं की सगळं संपलं, पण खरं सांगायचं तर, प्रत्येक अडचण ही एक नवीन सुरुवात घेऊन येत असते. कोरोनोच्या कठीण काळात अनेक जणांनी आपले जवळचे प्रिय व्यक्ती गमावलेत, काहींनी उपाशी राहून दिवस काढलेत तर काहींनी हजारो किलोमीटर पायी प्रवास केला. पण या सर्व संकटांवर त्यांनी मात केलीच ना? त्यामुळे वाईट वेळ ही कायमची सोबत राहत नाही, सर्वांच्या आयुष्यात अडचणी, दुःखे असतातच. फक्त कारण वेगवेगळे असते.

तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील किंवा तुम्हाला जर काही त्रास होत असेल, तर एकदा कोणाशी तरी मनमोकळेपणाने बोला. मग ते तुमचे मित्र असोत, कुटुंबीय असोत, किंवा एखादा विश्वासू व्यक्ती. या जगात मदत करणारे खूप लोक आहेत, फक्त तुम्हाला एक पाऊल पुढे टाकायचं आहे. हार आणि जय हे आयुष्याचे अंतिम ध्येय असू शकत नाहीत. हारलो तरी पुन्हा उभे राहून नव्याने सुरुवात करायची संधी आपल्याकडे नेहमीच असते. स्वतःला एखाद्या कामात व्यस्त करून घ्या. कोण काय म्हणेल याचा विचार करू नका, कोणालाच तुमच्याबद्दल विचार करायला वेळ नाही. म्हणूनच, कोणत्याही परिस्थितीत खचून जाऊ नका. स्वतःला सांगा की तुम्ही खंबीर आहात, आणि तुमचं आयुष्य हे तुमचं आहे, एका छोट्या अडचणीमुळे तुम्ही ते असं सहज संपवू शकत नाही.

आम्ही, बुलढाणा कव्हरेजच्या माध्यमातून, तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या प्रत्येक समस्येवर उपाय आहे. जर तुम्हाला काही अडचण असेल, काही त्रास होत असेल, तर आमच्या पोर्टलच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे नाव न सांगता तुमची समस्या लिहू शकता. आम्हाला शक्य असल्यास किंवा आमचे वाचक मिळून तुम्हाला योग्य सल्ला देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. कदाचित तुमच्या समस्येवर कोणाकडे तरी एक उत्तम उपाय असेल! आणि ज्यांना इतरांना मदत करता येईल, त्यांनीही पुढे येऊन कमेंट्समध्ये आपले विचार मांडावेत. एकमेकांना साथ देऊन आपण सगळे मिळून या संकटांवर मात करू शकतो.

मित्रांनो, आयुष्य अनमोल आहे. छोट्या-मोठ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी धैर्य आणि आत्मविश्वास ठेवा. प्रत्येक अडचणीला मृत्यू हाच उपाय नाही, तर नव्याने जगण्याची प्रेरणा शोधा. एक पाऊल पुढे टाका, आणि पाहा, आयुष्य तुम्हाला किती सुंदर संधी देऊ शकते!

Join WhatsApp

Join Now
WhatsApp Join Group!