चिखली, (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): गेल्या अनेक वर्षांपासून चिखली तालुक्यातील नागरिक आणि वकील बांधवांची प्रलंबित मागणी होती की, येथील महसुली प्रकरणांची सुनावणी उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत चिखलीतच व्हावी. ही मागणी अखेर पूर्ण झाली असून, यामागे चिखलीच्या लोकप्रिय आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांचा अथक पाठपुरावा आणि राज्य सरकारच्या तत्पर कारवाईचा मोठा वाटा आहे. या यशस्वी प्रयत्नांबद्दल चिखली वकील संघातर्फे आमदार श्वेताताई आणि श्री. विद्याधरजी महाले यांचा सत्कार नुकताच करण्यात आला.
चिखली वकील संघाने यापूर्वी अनेकदा जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली होती की, चिखली तालुक्यातील महसुली प्रकरणांसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान दोन दिवस चिखली तहसील कार्यालयात सुनावणी घ्यावी. यामुळे स्थानिक नागरिक आणि वकिलांना बुलढाणा येथे जाण्याचा त्रास आणि खर्च वाचेल. ही मागणी बऱ्याच काळापासून प्रलंबित होती. मात्र, आमदार श्वेताताईंनी या प्रश्नाला हात घातल्यानंतर अवघ्या आठ दिवसांत त्यावर ठोस निर्णय झाला. राज्याचे महसूलमंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिखलीतील महसुली प्रकरणांची सुनावणी येथील तहसील कार्यालयातच घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. यामुळे ३५ वर्षांनंतर चिखलीत पुन्हा एकदा अशी सुनावणी सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला.
दिनांक २५ जूनपासून चिखली तहसील कार्यालयात महसुली प्रकरणांच्या सुनावणीला सुरुवात होणार असून, यासंदर्भातील वेळापत्रक उपविभागीय अधिकाऱ्यांनी चिखली वकील संघाला पाठवले आहे. या निर्णयामुळे चिखलीतील वकील आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. चिखली वकील संघाने या यशस्वी प्रयत्नांबद्दल आमदार श्वेताताई आणि मंत्रालय स्तरावर या मागणीला पूर्णत्वास नेणारे श्री. विद्याधरजी महाले (मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव) यांचा सत्कार आयोजित केला होता. या समारंभात वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सोनाळकर यांनी श्री. विद्याधरजी महालेंचा सत्कार केला, तर अॅड. श्रीमती भंडारे, श्रीमती कुटे आणि श्रीमती पाटील यांनी आमदार श्वेताताईंचा सत्कार केला.
सत्कारप्रसंगी अॅड. कस्तुरे यांनी सांगितले की, “हा चिखलीच्या न्यायव्यवस्थेसाठी सुवर्णदिन आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आमदार श्वेताताईंच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागला. आम्ही पुढील मागणी करतो की, चिखलीत उपविभागीय अधिकाऱ्यांचे स्थायी कार्यालय आणि दिवाणी वरिष्ठ न्यायालय सुरू व्हावे.” त्यांनी श्वेताताईंच्या कार्याची प्रशंसा करताना त्यांना ‘विकासकन्या’ अशी उपमा दिली.
या समारंभात श्री. विद्याधरजी महाले यांनी आपल्या भाषणात म्हटले, “लोकशाहीची फळे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावीत, यासाठी सरकार कटिबद्ध आहे. चिखलीत उपविभागीय अधिकाऱ्यांची सुनावणी सुरू झाल्याने नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचणार आहेत. यामुळे प्रशासनात पारदर्शकता आणि सर्वसमावेशक विकास साध्य होईल.”
आमदार श्वेताताईंनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले, “भारतीय मतदार हाच आपला पक्षकार आहे. त्याची गैरसोय होऊ नये, यासाठी कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायव्यवस्था यांनी सतत प्रयत्न करायला हवेत. चिखली वकील संघाची रास्त मागणी सरकारदरबारी पोहोचवून ती तातडीने मान्य करवून घेणे, हे माझे भाग्य आहे. याशिवाय, चिखलीत अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशी न्यायालयाची इमारत उभारण्याचा माझा मानस आहे. यासाठी सुमारे ५५ कोटींची तरतूद करण्यासंदर्भात मी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असून, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.”
या कार्यक्रमात अॅड. संजीव सदार यांची भाजपा वकील सेलच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल श्वेताताईंच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. समारंभाला चिखली भाजपाचे अध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, शहराध्यक्ष सागर पुरोहित, गटविकास अधिकारी गजानन पोफळे, माजी नगराध्यक्ष सुहास शेटे, अॅड. मंगेश व्यवहारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शंतनु बोंद्रे, मनोज दांदडे, अॅड. कराडे, अॅड. गवई यांच्यासह अनेक वकील आणि मान्यवर उपस्थित होते.