मद्यधुंद कारचालकाचा कहर; तिघांना धडक देत टपरीत कार घुसली…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील बाळापूर फैल भागात मद्यधुंद कारचालकाने उच्छाद मांडत तिघांना जोरदार धडक दिली. त्यानंतर कार सुसाट वेगाने पुढे नेत दामजी विकमसी चौकात एका दुचाकीस्वाराला धडक दिली आणि शेवटी थेट एका टपरीमध्ये घुसली. या भीषण घटनेत तिघे जखमी झाले असून पोलिसांनी कार ताब्यात घेत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळापूर फैल भागातील बलवारपूर येथे रात्री श्री जगदंबा उत्सव मंडळाचा महाप्रसाद कार्यक्रम सुरू होता. रात्री सुमारास एक वाजता मंडळाचे कार्यकर्ते — रोहन राजू मकैकर (वय २५), गोलू रामू सावरकर (वय २५) आणि नितीन रामदास सावरकर (वय २६) हे तिघे रस्त्यावर उभ्या असलेल्या घंटागाडीत पत्रावळ्या टाकण्यासाठी गेले होते.
त्याच वेळी अकोला कडून भरधाव वेगात येणाऱ्या एमएच ०५-ईजे-०५१० या कारचा चालक दारूच्या नशेत कार चालवत होता. त्याने निष्काळजीपणे तिघांनाच धडक दिली आणि घटनास्थळावरून पोबारा केला.
या कारचा काही युवकांनी पाठलाग केला असता, कार दामजी विकमसी चौकात पोहोचली. येथे कारचालकाने शेख इमरान शेख कलीम यांच्या दुचाकी (एमएच २८ एसी-७९७०) ला धडक देऊन तिचे नुकसान केले. पुढे जाऊन हीच कार संदीप रमेश जरीया यांच्या टपरीमध्ये घुसली.
या अपघातात रोहन मकैकर, गोलू सावरकर आणि नितीन सावरकर हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कार ताब्यात घेतली आणि संबंधित मद्यधुंद चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!