सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): स्वातंत्र्याला 75 वर्षे उलटून गेली तरीही बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील लिंगा-काटे पांग्री गट ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या लिंगा गावातील ग्रामस्थांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. साधारण 700 लोकसंख्येचे हे छोटेसे गाव शेतीवर अवलंबून आहे. मात्र, रस्ते, पाणीपुरवठा आणि नाल्यांसारख्या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे येथील नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे आणि शासन-प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गावकऱ्यांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. “आमचे जगणे तुम्हाला मान्य आहे का?” असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
लिंगा गावात पक्का रस्ता नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आणि नाल्यांचा अभाव आहे. गावात पाणीपुरवठ्यासाठी पाइपलाइन टाकण्याचे काम काही वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले होते. यासाठी गावातील मुख्य काँक्रीट रस्ता खणून काढण्यात आला आणि नाल्याही उद्ध्वस्त झाल्या. मात्र, पाइपलाइन टाकून बराच कालावधी लोटला तरी रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. परिणामी, गावाचा मुख्य रस्ता चिखलमय झाला आहे. सांडपाणी रस्त्यावरूनच वाहत असल्याने गटारे तुंबली आहेत. यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढून रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, ज्या पाइपलाइनसाठी रस्ता खणला गेला, ती पाइपलाइनही कार्यान्वित झालेली नाही. गावकऱ्यांना अजूनही पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवर अवलंबून राहावे लागते.
या समस्यांमुळे गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन कठीण झाले आहे. गावात कोणी आजारी पडल्यास त्याला दवाखान्यात नेण्यासाठी रस्त्याची सुविधा नाही. शाळकरी मुलांना चिखल आणि सांडपाण्यातून तुडवत शाळेत जावे लागते, ज्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होते. विशेषतः पावसाळ्यात रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त होते, ज्यामुळे गावकऱ्यांना पायपीट करणेही कठीण झाले आहे.
गावकऱ्यांचा आरोप आहे की, ग्रामपंचायतीकडून या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. सरपंच गावात राहतच नाहीत आणि ग्रामपंचायत सचिवही गावात फिरकत नाहीत. ग्रामपंचायत केवळ नावापुरतीच उरली असून, गावातील समस्यांवर कोणतेही ठोस उपाय योजले जात नाहीत. यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
गावातील मूलभूत सुविधांच्या अभावामुळे त्रस्त झालेल्या बाळकृष्ण चेके, सुनिल चेके, भानुदास पैठणे, पांडुरंग चेके, शंकर भालेराव, संजय गाढवे, उमेश भालेराव, ज्ञानेश्वर चेके, भारत चेके, अनंता पैठणे, समाधान चेके, नवरत्न मानवतकर, लताबाई जाधव, सुरेश चेके, उद्धव चेके, संजय चेके, सचिन चेके, कैलास चेके, समाधान पैठणे, राधेश्याम शिंदे, प्रदीप भालेराव, शिवानंद चेके, भारत चेके यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी या समस्यांची तातडीने दखल घेऊन गावातील रस्ते, पाणीपुरवठा आणि नाल्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली आहे.














1 thought on “साहेब आमच जगणं मान्य करा? गावात जनावरे नाही, माणसं राहतात! स्वातंत्र्याच्या 75वर्षा नंतरही लिंगा वासीयांना भाेगाव्या लागतात नरकयातना…”