चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली तालुक्यातील केळवद येथे प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या तणावातून एका २० वर्षीय तरुणीने दुर्दैवी पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांनी संबंधित प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे आरोपी तनमय विजय गवई (रा. पाटोदा, ता. चिखली) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. आरोपीने लग्नाचे आश्वासन दिल्याने दोघांमध्ये नियमित संपर्क व भेटीगाठी सुरू होत्या. मात्र २४ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या फोन संभाषणात आरोपीने लग्नास स्पष्ट नकार दिल्याचे समोर आले आहे.
या नकारामुळे तरुणी मानसिक तणावात सापडली आणि तिने टोकाचा निर्णय घेतला. घटनेनंतर तरुणीच्या वडिलांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ अन्वये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.












