मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेहकर शहरातील पालवात परिसरात मानवतेलाही लाजवणारी धक्कादायक घटना घडली आहे. भटक्या समाजातील दीड वर्षांच्या चिमुकलीचा प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला होता. रात्री तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले; मात्र खड्डा नीट खोल न झाल्याने मोकाट कुत्र्यांनी तो उकरून चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढला आणि शरीराचे लचके तोडल्याचा हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे.
पोलीस निरीक्षक वेंकटेश्वर आलेवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहकर-जानेफळ रोडवरील पालवात येथे राहणाऱ्या भटक्या कुटुंबातील बालिकेची प्रकृती गुरुवारी अचानक बिघडली. तिला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी हलविण्याचा सल्ला दिला. मात्र उपचारापूर्वीच बालिकेचा रस्त्यात मृत्यू झाला.
कुटुंबीयांनी शोकाकुल मनाने त्या रात्रीच जानेफळ रस्त्यालगत महानुभाव पंथाच्या श्मशानभूमीजवळ अंत्यसंस्कार केले. मात्र खड्डा नीट खोल न खोदल्याने मृतदेह पूर्णपणे झाकला गेला नाही. परिणामी रात्री उशिरा मोकाट कुत्र्यांनी खड्डा उकरून प्रेत बाहेर काढले आणि काही भाग फाडून नेले.
पहाटे परिसरातील नागरिकांना मानवी अवयव दिसल्याने शहरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक आलेवार, पथक, श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. तपासानंतर हा प्रकार घातपाताचा नसून, अंत्यसंस्कार करताना झालेल्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, सामाजिक संस्थांनी भटक्या कुटुंबांना प्रशासनाने योग्य मार्गदर्शन आणि मदत करावी, अशी मागणी केली आहे.












