Kidney Donation: भविष्याचं अंधारून आलेलं दार, माऊलीच्या त्यागाने पुन्हा उजळलं! लता शिंगणे यांनी मुलाला दिली किडनी

Kidney Donation: भविष्याचं अंधारून आलेलं दार, माऊलीच्या त्यागाने पुन्हा उजळलं! लता शिंगणे यांनी मुलाला दिली किडनी

साखरखेर्डा (सचिन खंडारे: बुलडाणा कव्हरेज न्युज): “आई” या शब्दातच संपूर्ण विश्व सामावलेलं आहे. तिचं मातृत्व, तिचा त्याग, आणि संकटातही मुलासाठी अखंड उभं राहणं याचा एक जिवंत प्रत्यय देऊळगाव मही (ता. देऊळगाव राजा) येथील लता देविदास शिंगणे यांनी घडवून आणला आहे. आपल्या 21 वर्षीय मुलाला जीवदान देण्यासाठी त्यांनी स्वतःची एक किडनी (Kidney Donation) दिली आणि एका आईच्या वात्सल्याचा, दातृत्वाचा अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला.

ऋषी शिंगणे या तरुणाचं वय अवघं 21. शिक्षण घेऊन आयुष्याला दिशा देण्याचं त्याचं स्वप्न अचानक आजारपणामुळे ढासळलं. जन्मतःच एका किडनीशिवाय जन्मलेला ऋषी, मोठं होत असतानाच दुसरी किडनीही काम करेनाशी झाली. शरीरातील वाढते त्रास आणि आजारपणानं त्याची अवस्था चिंताजनक झाली. पुणे, नंतर संभाजीनगरच्या कमलनयन बजाज रुग्णालयात त्याची सखोल तपासणी झाली आणि त्यात उघड झालं की एकमेव असलेली किडनीही केवळ २० टक्के कार्यरत आहे. किडनी प्रत्यारोपणाशिवाय दुसरा पर्याय उरलेला नव्हता.

पण आर्थिकदृष्ट्या कमकुवत, १७ गुंठे शेती आणि लोकांच्या घरकामांवर उदरनिर्वाह करणाऱ्या लता शिंगणे यांच्यासाठी हा निर्णय सोपा नव्हता. याआधीही दोन मोठ्या शस्त्रक्रिया पार पाडलेल्या या माऊलीने मात्र कोणतंही द्विधा न बाळगता, आपल्या लेकरासाठी स्वतःची किडनी द्यायचं ठरवलं.

शहीद जवान सुनील नागरे यांना अश्रुपूर्ण श्रद्धांजली; गंधारी गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार..

२८ मार्च २०२५ रोजी कमलनयन बजाज रुग्णालयात आई आणि मुलाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. आज दोघांचीही प्रकृती स्थिर असून, ऋषीला पुन्हा एकदा नवसंजीवनी लाभली आहे. डॉक्टर मिलिंद वैष्णव, डॉ. अजय ओसवाल आणि डॉ. समीर महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया पार पडली.

या संपूर्ण प्रक्रियेमध्ये, देऊळगाव मही येथील डॉ. अलका गोडे, डॉ. ज्ञानेश्वर गोडे आणि डॉ. स्नेहल गोडे यांचं मोलाचं योगदान राहिलं. मागील १२ वर्षांपासून लता शिंगणे त्यांच्या घरी काम करत होत्या. संकटाच्या या काळात या डॉक्टर दांपत्याने केवळ भावनिकच नव्हे तर वैद्यकीय व आर्थिक पाठबळ देत खऱ्या अर्थाने देवदूताची भूमिका बजावली.

लता शिंगणे म्हणाल्या…

“मुलाच्या जन्मानंतर जसं समाधान मिळालं नव्हतं, तसं समाधान त्याला किडनी देताना मिळालं. मी काहीतरी महान कार्य केलं असं मला वाटत नाही. आई म्हणून हे माझं कर्तव्यच होतं. डॉक्टरांनी खूप सहकार्य केलं, यासाठी मी त्यांच्या सदैव ऋणी आहे.”

Join WhatsApp

Join Now

2 thoughts on “Kidney Donation: भविष्याचं अंधारून आलेलं दार, माऊलीच्या त्यागाने पुन्हा उजळलं! लता शिंगणे यांनी मुलाला दिली किडनी”

Leave a Comment

WhatsApp Join Group!