बोरगाव काकडे (महिंद्र हिवाळे, बुलडाणा कव्हरेज न्यूज): बिहारमधील पाटणा आणि राजगीर येथे 4 मे ते 15 मे 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या खेलो इंडिया युथ गेम्स 2025 या राष्ट्रीय स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील धोडप गावाचा सुपुत्र पियुष संजय कोल्हे याने तलवारबाजीच्या ‘एपे’ (Épée) प्रकारात सांघिक सुवर्णपदक मिळवून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. या यशामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासह चिखली तालुक्याचा गौरव वाढला आहे.
पियुष हा धोडप गावातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. चिखलीसारख्या छोट्या शहरात राहून त्याने तलवारबाजी या खेळात आपले कौशल्य विकसित केले. त्याच्या या यशामागे त्याची कठोर मेहनत, चिकाटी आणि प्रशिक्षक अक्षय गोलांडे यांचे अमूल्य मार्गदर्शन आहे. याशिवाय, बुलढाणा जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे सहकार्य आणि पियुषचे आई-वडील यांचे सातत्यपूर्ण पाठबळ यांचा मोलाचा वाटा आहे.
पियुषने या स्पर्धेत सांघिक तलवारबाजीच्या ‘एपे’ प्रकारात आपल्या संघासह उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याच्या या यशाने गावातील तरुणांना प्रेरणा मिळाली असून, खेळाच्या माध्यमातून यश मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांसाठी तो एक आदर्श ठरला आहे.
या यशाबद्दल पियुषचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. बुलढाणा जिल्हा आणि चिखली तालुका यांना त्याच्या या कामगिरीचा अभिमान वाटत आहे. पियुषच्या या यशामुळे स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
पियुषच्या पुढील वाटचालीसाठी बुलडाणा कव्हरेज न्यूजच्या वतीने हार्दिक शुभेच्छा!