सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) तालुक्यातील जऊळका येथील दलित शेतकरी प्रल्हाद नामदेव साळवे (वय ५९) यांनी कापूस विक्रीचे थकित पैसे मागितल्यावर व्यापाऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. कापूस व्यापाऱ्याकडे १,३७,७०९ रुपये बाकी असून पैसे मागितल्यावर शेतकऱ्यासोबत मारहाण, जातीवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी चार आरोपींवर अॅट्रॉसिटीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जऊळका येथील साळवे यांनी लिंगा येथील व्यापारी प्रल्हाद जायभाये यांच्याकडे १९ क्विंटल २६ किलो कापूस विकला होता. थकित रक्कम मागण्यासाठी १८ नोव्हेंबर रोजी साळवे दांपत्य व त्यांचा पुतण्या शिवाजी साळवे आरोपींच्या घरी गेले असता वाद निर्माण झाला. यावेळी प्रल्हाद जायभाये यांनी फिर्यादीची कॉलर पकडून ढकलाढकली केली. पवन जायभाये यांनी जातीवाचक शिवीगाळ केली, तर पुष्पा प्रल्हाद जायभाये आणि ऋतुजा पवन जायभाये यांनी साळवे यांच्या पत्नीला केसाला धरून मारहाण केली. तसेच “पुन्हा आलात तर जिवाने मारू” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
शेतकऱ्याचा कापूस घेऊन पैसे न देता आर्थिक फसवणूकही केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी किनगाव राजा पोलिसांनी प्रल्हाद आश्रुबा जायभाये, पवन प्रल्हाद जायभाये, पुष्पा प्रल्हाद जायभाये आणि ऋतुजा पवन जायभाये यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मनिषा कदम करीत आहेत.













