लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज) — मेहकरवरून प्रवाशी घेऊन लोणारकडे येणारी काळी-पिवळी रिक्षा चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने लोणारच्या पॉवर हाऊसजवळील वळणावर शेतात पलटी झाली. ही घटना आज २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता घडली.
रस्त्यावर अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून, बसस्थानक परिसरात पहिला नंबर मिळावा यासाठी काळी-पिवळी चालकांमध्ये शर्यत लागते. त्याच दरम्यान तीन रिक्षांची अशीच स्पर्धा सुरू असताना एका रिक्षाचे नियंत्रण सुटले आणि ती चार पलट्या खात शेतात जाऊन कोसळली. रिक्षाचा चक्काचूर झाला.
या अपघातात वैभव विजय मानवतकर (२२), सतिश परमेश्वर पवार (२५), कार्तिक किसन तेजनकर (१३), सतिश नागेश अंभोरे (१३) — सर्व वडगाव तेजन — तसेच गजानन त्र्यंबक साठे (४०), रा. शारा हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून, चालक सतिश पवार याला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी बुलडाणा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
काळी-पिवळी चालकांवरील पोलिसांचा अंकुश नसल्याने असे अपघात वाढत असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.













