अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) अंढेरा पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या दोन वेगवेगळ्या खळबळजनक हत्याकांडांमध्ये पोलिसांनी वेगवान कारवाई केली आहे. दोन जुळ्या मुलींचा गळा चिरून खून करणाऱ्या आरोपी पित्याला न्यायालयाने ४ दिवसांचा पोलिस कोठडी (पीसीआर) सुनावला आहे. तर दुसऱ्या घटनेत तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे.
पहिल्या घटनेत — आरोपी राहुल शेषराव चव्हाण (वय ३३, रा. रुई, ता. मानोरा, जि. वाशिम) या पित्याने कौटुंबिक वादातून स्वतःच्या दोन जुळ्या मुली कु. प्रणली आणि कु. प्रतीक्षा (वय अडीच वर्षे) यां
चा चाकूने गळा चिरून निर्घृण खून केला होता.
२५ ऑक्टोबर रोजी पुणे येथून आपल्या गावाकडे जाताना अंढेरा पोलिस स्टेशन हद्दीतील अंचरवाडी शिवारात आरोपीने मोटारसायकल थांबवून दोन्ही मुलींचा खून केला आणि नंतर रुई गावाकडे रवाना झाला. तीन दिवसांनंतर त्याने स्वतःच आपल्या नातेवाईकांना आणि आसेगाव पोलीसांना गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन घटनास्थळी जावून पाहणी केली असता दोन्ही मुलींचे कुजलेले मृतदेह सापडले.
अंढेरा पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, दुसऱ्या घटनेत — असोला येथील आकाश उत्तम चव्हाण (वय २२) या तरुणाचा त्याच्याच मित्रांनी चाकूने वार करून खून केला. आरोपीने मित्रासोबत अंढेरा येथे बोलावून घेतले होते. “फोनमधील फोटो व व्हिडिओ डिलीट कर” या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात आरोपीने मित्राच्या मदतीने आकाशचा पोटावर चाकूने वार करत खून केला.
या प्रकरणी मृतकाचे वडील उत्तम तोळीराम चव्हाण यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन अल्पवयीन आणि हर्षल नंदकिशोर गीते (रा. सरंबा, ता. देऊळगाव राजा) या तीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कलम 103(1), 3(5) BNS अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.













