बुलडाणा (ऋषि भोपळे-बुलडाणा कव्हरेज न्युज): सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांची प्रभाग रचना सुरू असल्याने सर्वच राजकीय पक्षांत उमेदवारांची चढाओढ दिसून येते. मात्र मागील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आलेल्या अनेक माजी सदस्यांना जनता पार विसरली आहे.
तिन्ही स्तरांवर गेली तीन वर्षे प्रशासकीय राजवट सुरू असल्याने माजी पदाधिकाऱ्यांची कार्यकाळातील कामगिरीही जनतेच्या विस्मरणात गेली आहे. यामध्ये कोणताही पक्ष नव्या नेतृत्वाची मजबूत बांधणी करू शकलेला नाही.
प्रशासकीय राजवटीत अधिकारी मनमानी करत असल्याची नागरिकांची तक्रार असून, निधी कोणाला मिळाला, किती काम झाले आणि त्याचा लाभ कुणाला मिळाला, हे सर्वच जनतेच्या मनात प्रश्न बनून राहिले आहेत.
महायुती आणि महाविकास आघाडीतही अद्याप उमेदवार आणि जागा वाटपाच्या तडजोडी पूर्ण झालेल्या नाहीत. कार्यकर्त्यांनाच पुढे करायचं की नवीन चेहऱ्यांना संधी द्यायची, याचा गोंधळ पक्षांत सुरू आहे.
जिल्हा परिषद आरक्षणात बदल होणार का?
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण ठरवण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. २०२२ मध्ये गट-गणात मोठे फेरबदल करण्यात आले होते. त्यामुळे नवीन आरक्षणात बदल झाल्यास आतापर्यंतची तयारी व मेहनत वाया जाईल, अशी चिंता इच्छुक उमेदवारांनी व्यक्त केली आहे.
पालिकेच्या निवडणुकीसाठी काही प्रभागांचे आरक्षण तसेच राहण्याची शक्यता आहे, मात्र वार्डांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकूणच काय?
राजकीय हालचाली सुरू असल्या तरी जनतेत मात्र माजी पदाधिकाऱ्यांविषयी फारशी चर्चा नाही. त्यामुळे या निवडणुकीत कोणाला संधी मिळणार आणि जनता कोणाच्या बाजूने कौल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
2 thoughts on “जुन्या जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्यांना जनता विसरली?”