चिखली, (राज धनवे- बुलढाणा कव्हरेज न्यूज): श्रीकृष्ण मंदिर, चिखली यांच्या वतीने आणि प. पू. प. म. संवत्सर बाबा यांच्या प्रेरणेने आयोजित पदयात्रा मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाली. ही पदयात्रा श्री दीपक शेठ दिघेकर यांच्या निवासस्थानापासून सुरू झाली होती. या पदयात्रेत चिखली परिसरातील अनेक गावांतील भक्तांनी उत्साहाने सहभाग घेतला. बुलढाणा येथे उपदेशी मंडळींनी या पदयात्रेचे जल्लोषात स्वागत केले. स्वागतादरम्यान रस्त्यावर सुंदर फुलांच्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, ज्यामुळे वातावरण आणखी उत्साही झाले.
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मोठी घोषणा; मत्स्य व्यवसायाला नवी उभारी: फडणवीस
पदयात्रेचा पहिला मुक्काम प. पू .प. म. आचार्य श्री लोणारकर बाबा यांच्या आश्रमात झाला. तिथेही पदयात्रेचे आनंदाने स्वागत झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता पदयात्रा बुलढाण्याहून जाळीचा देव येथे जाण्यासाठी निघाली. यात बुलढाणा, सव, रुईखेड टेकाळे आणि बिरसिंगपूर येथील अनेक भक्तांनी उत्साहाने सहभाग घेतला. बिरसिंगपूर फाट्यावर श्री अनिल भाऊ मुळे यांनी सकाळच्या नाश्त्याचे उत्तम आयोजन केले होते. तसेच, दुपारचे जेवण पाडळी येथील प. पू .प. म. पाटोदकर बाबा यांच्या आश्रमात आयोजित करण्यात आले होते. तिथेही पदयात्रेचे भव्य स्वागत झाले.
पाडळी येथून पदयात्रा पुढे पुष्पाताई मेहकरकर यांच्या आश्रमात पोहोचली. तिथे चहा-पाण्याची व्यवस्था करून भक्तांनी जाळीचा देव स्थानाला वंदन केले. त्यानंतर पदयात्रा प. पू .प. म. चिंचोलीकर बाबा यांच्या आश्रमात पोहोचली. तिथे प्रायश्चित विधी संपन्न झाले आणि चिंचोलीकर बाबांनी सहभोजनाचे आयोजन केले होते. सर्व भक्तांनी एकत्र भोजनाचा आनंद घेतला आणि यासह पदयात्रेचा समारोप झाला.
या पदयात्रेची संकल्पना सौ. अलकाताई वानखेडे आणि सौ. ज्योतीताई पडघान यांनी मांडली होती. त्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी श्रीमती ज्योतीताई वाळेकर आणि सौ. जयाताई मनोहरराव पळसकर यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच, श्री प्रदीप चंद्रकांत वाळेकर, श्री सचिन वाळेकर, श्री प्रकाश शेठ दिघेकर, श्री रमेश मस्के, श्री सतीश भाऊ देशमुख, श्री राजेंद्र हिवरकर, श्री प्रभू शेठ इवरकर (सोनेवाडी), श्री अजय वाळेकर, श्री संतोष वाळेकर, श्री दामुअण्णा टेकाळे, श्री लक्ष्मणराव टेकाळे, श्री प्रवीण दारव्हेकर, श्री प्रकाश वायाळकर, श्री दीपक शेठ दिघेकर, श्री सुनील वानखेडे, श्री निलेश भाऊ धनवे आणि चिखली येथील सर्व उपदेशी मंडळींनी या पदयात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले.
ही पदयात्रा केवळ धार्मिक कार्यक्रमच नसून, परिसरातील भक्तांमध्ये एकता आणि उत्साह निर्माण करणारा एक अनमोल प्रसंग ठरला. अशा उपक्रमांमुळे सामाजिक आणि सांस्कृतिक बंध अधिक दृढ होतात, असे भक्तांनी व्यक्त केले.