चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली शहरात लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे. हा केवळ एक ऐतिहासिक क्षण नाही, तर जगदंबा उत्सव समितीच्या 51 वर्षांपूर्वीच्या स्वप्नाची पूर्तता आहे. या समितीने अथक प्रयत्न आणि संघर्षातून हा पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
सन 1974-75 मध्ये चिखली नगरपालिकेकडे पुरेसा निधी नसल्याने अर्धवट पुतळा उभारण्याचा विचार होता. मात्र, त्या काळात जगदंबा उत्सव समितीचे अध्यक्ष स्व. रमेश भुसारी, सचिव स्व. सुभाष मालानी, कोषाध्यक्ष शिवाजी बनसोडे, तसेच गणपतराव बनसोडे, ताराचंद खत्री, श्रीराम कुटे आणि अरुण गुप्ता यांनी पूर्णाकृती पुतळ्यासाठी आग्रह धरला. या मागणीसाठी त्यांनी जोरदार पाठपुरावा सुरू केला.
26 जानेवारी 1975 रोजी चिखलीतील स्टेट बँकेसमोर शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, यासाठी समितीने आंदोलन केले. या आंदोलनाला पोलिसांच्या लाठीमाराचा सामना करावा लागला, तरीही समितीच्या सदस्यांनी आपला निर्धार सोडला नाही. त्यांच्या या अथक प्रयत्नांना यश आले आणि नगरपालिकेने पूर्णाकृती पुतळा उभारण्यास मान्यता दिली. त्या वेळी तात्यासाहेब बोद्रे हे चिखली नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते. त्यांच्या कार्यकाळात या आंदोलनाला गती मिळाली आणि पुतळा उभारणीचा मार्ग सुकर झाला.
आज, तब्बल पाच दशकांनंतर, आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रयत्नांमुळे चिखलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याचे कार्य पूर्णत्वाकडे आहे. हा पुतळा केवळ शहराच्या सौंदर्यात भर घालणार नाही, तर शिवरायांच्या पराक्रमाची आणि नेतृत्वाची प्रेरणा पुढील पिढ्यांना देईल.
जगदंबा उत्सव समितीची स्थापना 1974 मध्ये झाली. चिखलीत पहिल्यांदा सार्वजनिक उत्सव सुरू करणारी ही समिती आहे. उत्सवांपुरते मर्यादित न राहता, या समितीने सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे समाजसेवेचा एक आदर्श घालून दिला. या पुतळ्याच्या उभारणीमुळे समितीच्या कार्याला एक नवी उंची प्राप्त झाली आहे.












