इसरूळ (बुलडाणा कव्हरेज न्युज) :चिखली तालुक्यातील इसरूळ गावच्या शिवारात अज्ञात इसमाने शेतकऱ्याच्या कष्टावर घाला घालत तुरीच्या पिकाची सूडी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना १२ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली.
इसरूळ येथील शेतकरी अशोक रूजाजी खरात यांच्या गट क्रमांक ३६७/१ मधील शेतजमीन बटाई तत्त्वावर (ठोका पद्धतीने) शेख हामिद अब्दुल शेख हे कसत होते. सदर शेतात तूर पिकाची लागवड करण्यात आली होती. चार ते पाच दिवसांपूर्वी कापणी करून काढणीसाठी लावलेली तुरीची सूडी अज्ञात व्यक्तीने जाळून टाकली.
या तुरीच्या पिकातून १२ ते १३ क्विंटल उत्पादन होण्याची शक्यता होती. मात्र, काढणीपूर्वीच सूडी जळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेत १३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पंचनामा करण्यात आला. पंचनाम्यावेळी सरपंच सतीश पाटील, ग्राम महसूल अधिकारी अनिल बोन्द्रे, ग्रामपंचायत अधिकारी संदीप रिंढे, तंटामुक्ती अध्यक्ष कृष्णा काळे, ग्रामपंचायत सदस्य तथा पत्रकार भिकनराव भुतेकर, पीडित शेतकरी शेख हामिद शेख अब्दुल तसेच गजानन काळूबा भुतेकर उपस्थित होते.
सदर पंचनामा चिखली तहसीलदार विजय सवडे व जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. या प्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.












