अमरावती (बुलडाणा कव्हरेज न्युज) इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याची आणि ८० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार राजापेठ पोलिसात दाखल झाली आहे.
आरोपीचे नाव साहिल दिनेश घाटोळ (२५), रा. प्रतीकनगर, मूर्तिजापूर, जि. अकोला असे आहे. त्याच्याविरुद्ध बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पीडित तरुणी अमरावती शहरात भाड्याच्या रूमवर राहून शिक्षण घेत होती. मार्च २०२४ मध्ये इंस्टाग्रामवर तिची साहिलशी ओळख झाली. दोघांचे फोनवर बोलणे सुरू झाले आणि आरोपीने तिला प्रेम व लग्नाचे आमिष दिले.
यानंतर त्याने तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. एवढेच नव्हे तर तिच्याकडून ८० हजार रुपयेही घेतले. शेवटी ‘‘मला तुझ्याशी लग्न करायचं नाही, दिलेले पैसेही परत करणार नाही… तुझ्याकडून जे होईल ते करून घे’’ असे म्हणत तो पसार झाल्याचे तरुणीने सांगितले.
तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपी साहिल घाटोळविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.











