चिखली, (बुलढाणा कव्हरेज न्यूज): भरोसा येथील मेहनती शेतकरी दांपत्य रंजना गणेश थुट्टे आणि गणेश श्रीराम थुट्टे यांनी हुमणी अळीच्या हल्ल्यामुळे झालेल्या पिकाच्या मोठ्या नुकसानीसह बँक कर्जाच्या वाढत्या ताणामुळे आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. ही घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे. अशा घटनांमुळे शेतकरी कुटुंबाच्या आयुष्यावर किती मोठा आघात होतो, याचा विचार सरकारने करावा. कृषी संकटाच्या छायेत जगणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न फक्त संवेदना व्यक्त करून सुटणार नाहीत; तर शासनाने ठोस उपाययोजना करून शेतकऱ्यांच्या जगण्याला आधार द्यावा, असे प्रतिपादन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी केले.
बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह हर्षवर्धन सपकाळ यांनी थुट्टे कुटुंबीयांच्या घरी जाऊन मुलगा नागेश थुट्टे आणि सून शितल थुट्टे यांची भेट घेतली. काँग्रेस पक्षाच्या वतीने थुट्टे कुटुंबीयांना धीर देऊन त्यांचे सांत्वन करण्यात आले. यावेळी हर्षवर्धन दादा सपकाळ बोलत होते. या वेळी अशोक पडघान, सत्येंद्र भुसारी, बाळासाहेब गावंडे, डॉ. इसरार, राहुल सवडतकर, प्रा. राजू गवई, गणेश थुट्टे, सचिन शेटे, रोहन पाटील, शिवराज बोंद्रे, अदनान खान, शेख बबलू, व्यंकटेश रिंढे, शुभम बुर्कुले यांच्यासह शेकडो काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून ५१ हजारांची मदत जाहीर
शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता दाखवत काँग्रेस पदाधिकारी नेहमीच संकटकाळी धावून गेले आहेत. थुट्टे दाम्पत्याच्या शेतातील पिकांवर हुमणी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे सोयाबीन पिकाचे गंभीर नुकसान झाले. परिणामी, आर्थिक आणि मानसिक तणावामुळे त्यांनी अत्यंत टोकाचे पाऊल उचलले. या घटनेनंतर माजी आमदार राहुल बोंद्रे, चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव पडघान आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबाला ५१ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. लवकरच ही मदत थुट्टे कुटुंबीयांना सुपूर्द केली जाणार आहे.