
चिखली (राजेश लोखंडे, बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींच्या (Grampanchayat Nivadnuk) सरपंचपदासाठी आरक्षणाची सोडत आज तहसील कार्यालयात पार पडली. तहसीलदार संतोष काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रभारी नायब तहसीलदार खाडे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण झाली. सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी हे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
Grampanchayat Nivadnuk: खुल्या प्रवर्गात महत्त्वाची गावे, राजकीय कार्यकर्त्यांना दिलासा
आरक्षण सोडतीत मिसाळवाडी, मेरा बुद्रूक, शेळगाव आटोळ, देऊळगाव धनगर, इसरूळ, डोंगरशेवली, आंचरवाडी यांसारखी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची गावे सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी सुटली. यामुळे सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी तयारी करणाऱ्या अनेक राजकीय कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खुल्या प्रवर्गातील गावांमध्ये उमेदवारांनी आपली तयारी तीव्र केली आहे.
मागासवर्गीय आणि अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण
काही गावांचे सरपंचपद मागासवर्गीय आणि अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. अंत्री खेडेकर, साकेगाव, गांगलगाव, गुंजाळा ही गावे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी, तर सवणा आणि मेरा खुर्द ही गावे मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहेत.
महिलांसाठी स्वतंत्र सोडत
महिलांसाठी सरपंचपदाच्या आरक्षणाची स्वतंत्र सोडत २५ एप्रिल २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.
Darubandi: मेंडगाव गाव एकवटले: ‘दारूमुक्ती’साठी महिलांचा निर्धार, पोलिसांचा १००% बंदीचा शब्द!
सोडतीदरम्यान तहसील कार्यालयात गर्दी
आरक्षण प्रक्रियेदरम्यान तहसील कार्यालयात सरपंचपदाचे इच्छुक, ग्रामपंचायत सदस्य आणि राजकीय कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. या प्रक्रियेत निवडणूक अधिकारी कडू आणि मुख्य लिपीक काकडे यांचीही उपस्थिती होती.

आरक्षणानुसार गावांची वर्गवारी
खालील तक्त्यात निवडक गावांचे आरक्षणानुसार वर्गीकरण देण्यात आले आहे:
प्रवर्ग | गावांची नावे |
---|---|
सर्वसाधारण (खुला) | मिसाळवाडी, मेरा बुद्रूक, शेळगाव आटोळ, डोंगरशेवली, देऊळगाव धनगर, आंचरवाडी, अंबाशी, अमोना, असोला बुद्रूक, आंधई, इसरूळ, डासाळा, धोत्रा भनगोजी, भोगावती, शेलगांव जहांगीर, मुरादपूर, शेलसूर, भोकर |
मागासवर्गीय (ना.मा.प्र.) | सवणा, आमखेड, इसोली, भानखेड, मंगरूळ नवघरे, वैरागड |
अनुसूचित जाती (अ.जा.) | अंत्री खेडेकर, साकेगाव, गांगलगाव, गुंजाळा, चंदनपूर, कोनड खुर्द, कवठळ, ब्रम्हपुरी |
राजकीय समीकरणांना गती
आरक्षणामुळे अनेक गावांमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. खुल्या प्रवर्गातील गावांमध्ये इच्छुकांनी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. काही उमेदवारांचे मार्ग आरक्षणामुळे बंद झाले असले, तरी नव्या उमेदवारांना संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे गावपातळीवरील राजकीय हालचालींना वेग आला आहे.