बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – सध्या सोशल मीडियावर घिबली स्टाईलमधील (Ghibli Style) एआय जनरेटेड फोटोंचा ट्रेंड जोर धरत आहे. युजर्स मोठ्या प्रमाणावर स्वतःचे, आपल्या कुटुंबातील सदस्यांचे आणि अगदी लहान मुलांचेही फोटो अपलोड करत आहेत. मात्र, हा ट्रेंड निरपराध नाही, तर यामागे तुमच्या चेहऱ्याचा डेटा गोळा करण्याचा मोठा डाव असू शकतो, असा इशारा सायबर तज्ज्ञ देत आहेत.
तुमचा चेहरा अब्जावधींच्या बाजाराचा भाग?
Statista च्या अहवालानुसार, फेशियल रिकग्निशन टेक्नोलॉजीचा बाजार 2025 पर्यंत 5.73 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल, तर 2031 पर्यंत तो 14.55 अब्ज डॉलर्सवर जाईल. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या या तंत्रज्ञानावर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत.
आपणच आपल्या चेहऱ्याचा डेटा कंपन्यांना देतोय!
घिबली एआय ट्रेंड हा केवळ एक निमित्त आहे. यापूर्वीही अनेक माध्यमांतून युजर्सचा चेहऱ्याशी संबंधित डेटा वेगवेगळ्या कारणांसाठी वापरला जातो.
- फोन अनलॉक करण्यासाठी फेस आयडीचा वापर
- सोशल मीडियावर फोटो टॅगिंग आणि फिल्टर्ससाठी कॅमेरा अॅक्सेस देणे
- स्मार्ट सिटी आणि सीसीटीव्ही सिस्टीम्समधील डेटा गोळा केला जाणे
सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, एकदा तुमचा चेहरा डेटाबेसमध्ये संग्रहित झाला, तर तो कायमस्वरूपी राहतो आणि त्याचा कधी, कुठे, कसा वापर केला जातो हे सांगता येत नाही.
फेशियल डेटा चोरीचा वाढता धोका
गेल्या काही वर्षांत फेशियल रिकग्निशन डेटाशी संबंधित अनेक घटनांनी चिंता वाढवली आहे.
- Clearview AI प्रकरण (2020): या कंपनीने 3 अब्जांहून अधिक फोटोज सोशल मीडियावरून परस्पर काढून एक डेटाबेस तयार केला आणि तो पोलीस विभाग व खाजगी कंपन्यांना विकला.
- Outabox डेटा लीक (2024): ऑस्ट्रेलियातील Outabox कंपनीचे 10.5 लाख युजर्सचे फेशियल स्कॅन्स, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पत्ते हॅकर्सने लीक केले.
- डीपफेक आणि डिजिटल फ्रॉड: फेशियल डेटा चोरून बनावट व्हिडिओ आणि खोटी ओळखपत्रे तयार करण्याचे प्रकार वाढत आहेत.
कंपन्या तुमच्या चेहऱ्यावर पैसा कमावतायत?
Statista च्या अहवालानुसार, फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानाचा वार्षिक वृद्धी दर (CAGR) 16.79% आहे. गूगल, मेटा (फेसबुक) आणि इतर अनेक तंत्रज्ञान कंपन्यांवर आरोप आहेत की त्या युजर्सचा फोटो डेटा एआय मॉडेल्स प्रशिक्षणासाठी वापरतात, मात्र त्याची माहिती देत नाहीत. PimEyes सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे कोणाचाही फोटो अपलोड करून त्याचा ऑनलाइन मागोवा घेता येतो, ज्यामुळे सायबर स्टॉकिंग आणि ओळख चोरीचे प्रमाण वाढत आहे.
डेटा चोरीपासून वाचायचे असेल तर…
- घिबली स्टाईल फोटो ट्रेंड टाळा.
- सोशल मीडियावर हाय-रिझोल्यूशन फोटोज अपलोड करू नका.
- फेस अनलॉकऐवजी पिन किंवा पासवर्ड वापरा.
- एआय कंपन्यांकडून तुमचा डेटा कसा वापरला जातो, याची माहिती मागा.
- सरकारने बायोमेट्रिक डेटाच्या गैरवापरावर कठोर नियम लागू करावेत, यासाठी जनजागृती करा.
सावध राहा, चेहरा तुमचा – नियंत्रणही तुमचेच असावे!
सध्या कोणत्याही ठोस नियमांशिवाय फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. भविष्यात याचा गैरवापर टाळण्यासाठी युजर्सनी स्वतः सतर्क राहणे आणि सरकारकडे कडक कायद्यांची मागणी करणे गरजेचे आहे. तुमच्या चेहऱ्याचा डेटा कोण आणि कशासाठी वापरतोय, हे जाणून घ्या आणि डिजिटल सुरक्षेला प्राधान्य द्या!