बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): गावं म्हणजे आपल्या देशाचा आत्मा. इथली माणसं एकमेकांशी जिव्हाळ्याने जोडलेली असतात. शहरामध्ये जो फक्त ओळखीपुरता संबंध असतो, तो इथे जिव्हाळ्याचा असतो. पण हा जिव्हाळा अनेकदा गावातल्या तुच्छ राजकारणामुळे कुठेतरी तुटतो. कारण फक्त आणि फक्त विरोधाचं राजकारण! गावातलं राजकारण हे फक्त निवडणुका किंवा मतदान यापुरतं मर्यादित न राहता, ते गावातल्या प्रत्येक गोष्टीत शिरतं – मग ती सामाजिक बाब असो, सण-उत्सव असो, लग्नकार्य असो, सुख दुःख असो, की गावाच्या विकासाची कामं असोत.
प्रत्येक गावात दोन-तीन गट असतात, जे आपापसात सतत भांडतात. आणि हे गट आपल्या स्वार्थासाठी नेहमीच गावाला वेठीस धरतात. त्यांच्या या भांडणात सामान्य गावकरी भरडला जातो. गावातली एकता तुटते, विकास रखडतो आणि माणसामाणसात दुरावा येतो. याची त्यांना कदाचित जाणीव नसते. प्रत्येक गोष्टींमध्ये यांना वर्चस्व हवे असते. यांच्या मनाविरुद्ध एखादे काम करणे म्हणजे यांचा पिढीजात इगो हर्ट करण्यासारखे आहे.
गावातलं राजकारण म्हणजे एका अर्थाने गावातल्या काही मूठभर लोकांचा करमणुकीचा खेळ. हे लोक स्वतःला गावाचा मालक असल्यासारखे वागतात. आणि ते त्यांच्याकडे असलेल्या पैशाचा, संपत्तीचा आणि काही वरिष्ठ नेतेमंडळींच्या नावाचा पुरेपूर वापर यासाठी करतात. कधीकधी हे लोकांना धमकावण्यासाठी दबावाच्या राजकारणाचा किंवा गुंडगिरीचाही उपयोग करतात.
गावातले हे दोन-तीन गट एकमेकांशी सतत स्पर्धेत असतात. आणि यांची ही स्पर्धा पिढीजात असल्याचे दिसून येते. त्यांचं ध्येय फक्त एकच – गावावर आपली सत्ता गाजवायची. सर्वांनी आमच्या मतानुसार वागावं. त्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. गावातली माणसं ही त्यांच्या सोईनुसार “आमचे” आणि “त्यांचे” अशा दोन गटांत विभागली जातात. ही विभागणी फक्त राजकारणापुरती मर्यादित राहत नाही. ती गावातल्या प्रत्येक गोष्टीत पसरते.
उदाहरणच घ्या – गावात कुणाचं लग्न आहे, ज्याचा राजकारणाशी काहीच संबंध नाही, आणि त्याने दुसऱ्या गटातल्या नेत्याला किंवा त्याच्या मित्राला बोलावलं, तर दुसऱ्या गटाचे हे मूठभर राजकारणी लोक त्याच्यावर चिडतात. “तू त्याला का बोलावलं?” असा जाब विचारतात. आणि त्याचा कार्यक्रम अर्ध्यावर सोडून जातात. कधी-कधी तर त्या माणसाच्या घरावर बहिष्कार टाकला जातो. यामुळे कोणी कोणासोबत मैत्री करावी की करू नये, हे पण हेच ठरवणार. आणि यांच्या कार्यक्रमात हे सर्व गावाला बोलावणार, तिथे कोणीच त्यांचा विरोध करणार नाही, केला तर आणखी यांचा इगो हर्ट होतो. या गोष्टी लग्नकार्यापुरत्याच मर्यादित राहत नाहीत. कोणी कोणाच्या अंत्यसंस्काराला जावं की जाऊ नये, याबद्दल पण हे लोक बैठकी बसवतात. अरे, गेला तो संपला आता, काय हे तिथे पण राजकारण? अशा छोट्या-छोट्या गोष्टींमुळे गावातली माणसं एकमेकांपासून दूर करण्याचं काम हे राजकारणी करत असतात.
पूर्वी गावांचा शहरांशी फारसा संबंध नव्हता. त्यावेळी हे राजकारण आणखी तीव्र होतं. गावातील सत्ता ही काही मोजक्या लोकांच्या हाती होती. ज्यांच्याकडे जास्त शेती किंवा संपत्ती होती, त्यांच्याकडे ही सत्ता असायची. त्यामुळे गावकरी उदरनिर्वाहासाठी किंवा सामाजिक सुरक्षेसाठी या लोकांवर पूर्णपणे अवलंबून होते. म्हणून गावातल्या प्रत्येक गोष्टीत यांचा सहभाग असायचा. आणि दुसरा काही पर्याय नसल्याने गावकरी यांच्या प्रत्येक गोष्टींचा मान ठेवायचे. गावकऱ्यांना त्यांना विरोध करण्याची हिंमतच व्हायची नाही. मात्र गाव एकत्रित ठेवण्यात या लोकांचा वाटा होता हे पण महत्वाचे आहे.
पण आता काळ बदलला आहे. गावं शहरांशी जोडली गेली आहेत. शिक्षण वाढलं, इंटरनेट आणि मोबाइलमुळे गावकऱ्यांना बाहेरच्या जगाची माहिती मिळते. ते आता जागरूक झाले आहेत. तरीही काही राजकारणी जुन्या पद्धतीनेच वागतात. त्यांना अजूनही वाटतं की गावकरी त्यांच्या ताब्यात आहेत. पण ही त्यांची फार मोठी चूक आहे. गावकरी आता कोणाच्या दबावाखाली येत नाहीत. ते प्रश्न विचारतात, आपले हक्क मागतात आणि सरकारी योजनांची माहिती घेतात. आणि ही बाब या स्वयंघोषित गावचे मालक समजणाऱ्या मोजक्या राजकारण्यांना आवडलेली दिसत नाही.
या राजकारणाचा सर्वात मोठा परिणाम होतो तो गावाच्या विकासावर. गावात रस्ते, पाणी, शाळा, आरोग्य केंद्र यासारख्या मूलभूत सुविधा असायला हव्यात. पण राजकारणी आपल्या स्वार्थासाठी या कामांना खीळ घालतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या गटाने गावात रस्ता बांधण्याचा प्रस्ताव मांडला, तर दुसरा गट त्याला विरोध करतो. इथे एखाद्याच्या साध्या विनंतीला पण विरोध समजल्या जातो. अशा राजकीय खुन्नसामुळे गावातली कामं रखडतात. याशिवाय, गावातला विकास निधीचा गैरवापर हा तर नेहमीचाच प्रकार आहे. रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं केलं जातं, एखादी योजनाच गडप केली जाते, गावातली शाळा बांधायला पैसा येतो, पण ती अर्धवट राहते. पाण्याची योजना मंजूर होते, पण पाणी गावापर्यंत पोहोचतच नाही. याचं कारण एकच – राजकारण्यांचा स्वार्थ.
या सगळ्यात सामान्य गावकरी कसा भरडला जातो, हे पाहिलं की मन सुन्न होतं. गावात एखाद्या माणसाने दुसऱ्या गटाच्या व्यक्तीच्या उत्सवात किंवा दुःखात भाग घेतला, तर त्याला बहिष्कृत केलं जातं. हा आमच्या पार्टीचा नाही, म्हणून त्याचं काम अडवून ठेवायचं, त्याला टार्गेट करायचं, त्याच्यासोबत असलेले इतर लोकांचे संबंध तोडायचे. अशा दबावतंत्रामुळे गावकरी नेत्यांच्या दबावाखाली येतात. गावातल्या सामान्य माणसाचं यात काहीच देणं-घेणं नसतं, त्याने तर तुम्हाला निवडून देण्याचं काम केलं, मग तुम्ही त्यांना फोडायचं काम का करता? परंतु त्यालाच पुढे करून ही मंडळी आपला स्वार्थ साधतात. एखादा रिकामचोट हाताशी धरून लोकांना त्रास देण्याचं राजकारण हे करत असतात. त्यामुळे सामान्य लोकांना आपलं मत मांडायची हिंमतच होत नाही. आणि एखाद्याने आपले मत मांडलेच तर त्याला विरोध समजले जाते, मग त्याला समजावण्यापेक्षा संपवण्याचा प्रयत्न देखील केला जातो. अशी नीच प्रवृत्ती काही गावातील राजकारण्यांमध्ये दिसून येत आहे.
गावातली ही फूट पाडण्यासाठी राजकारणी अनेक युक्त्या वापरतात. ते जाती, धर्म, आर्थिक स्तर यावरून गावकऱ्यांना विभागतात. गावातलं मंदिर, पाणी, सामाजिक स्थळे किंवा रस्ता यावरून वाद लावतात. एखाद्या विरोधकाला उकसवण्यासाठी त्याच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला टार्गेट केलं जातं, ज्याचा या तुच्छ राजकारणाशी काडीचाही संबंध नसतो. त्याला जाणूनबुजून त्रास दिला जातो. यामुळे गावातली एकता तुटते आणि सामान्य माणूस या वादात अडकतो. गावात गट पडतात, आणि या गटागटात गावकरी एकमेकांविरुद्ध लढत राहतात. काही तर या राजकारण्यांना कंटाळून गाव सोडून शहराची वाट धरतात. पण जे गाव सोडू शकत नाहीत, ते मात्र यात भरडले जातात. पण यात खरा फायदा कोणाचा होतो? फायदा होतो तो फक्त राजकारण्यांचा. ते आपला स्वार्थ साधतात आणि गावकऱ्यांना आपसात भांडायला लावतात. त्यांच्या मनात येईल तेव्हा ते भांडतात आणि त्यांच्या मनात येईल तेव्हा ते एकत्र येतात, पण यांच्या राजकारणामुळे एकमेकांपासून दूर गेलेला सामान्य माणूस मात्र भांडतच राहतो.
गावातलं राजकारण हे गावकऱ्यांच्या कुचंबनेचं मूळ आहे. काही नीच राजकारणी आपल्या स्वार्थासाठी गावकऱ्यांमध्ये फूट पाडतात, विकासाला खीळ घालतात आणि सामान्य माणसाला हतबल करतात. त्यांच्या या चुका गावकऱ्यांचं किती नुकसान करतात, गावातील सामाजिक वातावरण कसं प्रदूषित करतात, याचा विचारच त्यांना येत नाही. यांच्या भांडणात गावातले रस्ते खराब राहतात, शाळा अर्धवट राहतात, योजनांमध्ये भ्रष्टाचार केला जातो त्यामुळे लोकांना असुविधा होतात, आणि गावकरी एकमेकांपासून दूर जातात. पण यांना त्यामुळे काहीच फरक पडत नाही. गावाच्या विकासापेक्षा एकमेकांवर कुरघोडी करण्यातच हे समाधानी असतात. सामान्य लोक याबद्दल पुढे येऊन बोलत नाहीत, पण या गोष्टीमुळे ते कुठेतरी दुखावले जातात.
पण आता गावकरी बदलत आहेत. ते जागरूक होत आहेत. त्यांना आपल्या हक्कांची जाणीव होत आहे. त्यामुळे राजकारण्यांनीही आता बदलायला हवं. प्रत्येक जण तुमच्या मर्जीने वागण्यासाठी तुमच्यावर अवलंबून नाही. प्रत्येकाचं स्वतंत्र आयुष्य आहे, त्याने कोणाला जवळ करायचं आणि कोणापासून दूर राहायचं हे तुम्ही ठरवू शकत नाही. सामान्य लोकांचा अंत पाहू नका. तुमच्या या फोडाफोडीच्या राजकारणामुळे तुमच्या जवळचे खुश होतील पण गावातील इतर लोक तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत. ते तुम्हाला डोक्यावर घेऊ शकतात, पण जर गरज पडली तर खाली खेचायलाही मागेपुढे पाहणार नाहीत. त्यामुळे राजकारण्यांनी प्रामाणिकपणे काम करायला हवं. एखाद्या गरीबाच्या शुभकार्याला राजकीय केंद्र बनवू नका. तिथे नसतं पुढेपुढे करून स्वतःचं मोठेपण दाखवण्याची गरज नाही. तुमच्या या पुढेपुढेपणामुळे प्रत्येकालाच आनंद होईल असं नाही. राजकारण हे समाजकारणात आणू नये. लोकांच्या भावना समजून घ्या. एखादा भ्रष्टाचार ते कदाचित खपून घेतील पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यात/कार्यक्रमात ढवळाढवळ ते कधीही खपवून घेणार नाहीत.
गावकऱ्यांनी पण एकजुटीने आपल्या हक्कांसाठी लढायला हवं. गावं ही खऱ्या अर्थाने देशाची ताकद बनतील, जर राजकारण स्वच्छ आणि प्रामाणिक झालं तर. गावकऱ्यांनी आता हातात हात घालून पुढे जायचं आहे. राजकारणाला बाजूला ठेऊन समाजकारणाला जवळ करायचे आहे. आपल्या गावाला प्रगतीच्या दिशेने न्यायचं आहे. आणि हे सगळं शक्य आहे, जर सर्व गावकऱ्यांनी अशा स्वार्थी, फूट पाडणाऱ्या राजकारणाला मूठमाती दिली तर…!
3 thoughts on “गाव गाड्याच्या राजकारणात सामान्य गावकऱ्यांची कुचंबना, सामाजिक फूट आणि रखडलेली प्रगती; फुटीच्या राजकारणाला मूठमाती देण्याची गरज?”