मेरा बुद्रुक (कैलास आंधळे- बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मित्राच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी सुट्टीवर आलेल्या एका युवा पोलीस कर्मचाऱ्याचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. गणेश सुखदेव डोंगरदिवे (वय २३, रा. मेरा बुद्रुक) असे या मृत पोलीस जवानाचे नाव आहे. आज सकाळी त्यांचा मृतदेह गावात आणण्यात आला, तेव्हा शोकाकुल वातावरणात पोलिस मानवंदनेनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गणेश डोंगरदिवे हे मेरा बुद्रुक येथील रहिवासी होते. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. तरीही, अथक मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी २०२३ मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात भरती मिळवली. सध्या ते मुंबईतील नायगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी एक वर्षाची सेवा यशस्वीपणे पार पाडली होती.
प्रकाशभाऊ डोंगरे यांची सामाजिक बांधिलकी: धोडप येथील मांडवे कुटुंबाला 21 हजारांची मदत
१७ जून २०२५ रोजी गणेश हे मित्राच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी सुट्टी घेऊन मोताळा तालुक्यातील एका गावात गेले होते. कार्यक्रम आटोपून रात्री परत येत असताना त्यांच्या दुचाकीचा मोताळा-बुलडाणा रस्त्यावर अपघात झाला. या अपघातात गणेश यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला. स्थानिक शेतकऱ्यांनी तातडीने मदत करत जखमी मित्राला बुलडाणा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. गणेश यांचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आला.
रात्री उशिरा शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर आज सकाळी गणेश यांचा मृतदेह मेरा बुद्रुक येथे आणण्यात आला. मृतदेह गावात पोहोचताच गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली. गणेश यांच्या अंतिम दर्शनासाठी नातेवाईक, मित्र आणि परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. सुरुवातीला पोलिस मानवंदनेचे नियोजन नव्हते, मात्र ग्रामपंचायत सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ यांनी पुढाकार घेत बुलडाणा येथील पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधला. त्यानंतर बुलडाणा येथून पोलीस पथक गावात दाखल झाले आणि गणेश यांना शासकीय सन्मानाने निरोप देण्यात आला.
या प्रसंगी अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे, दुय्यम ठाणेदार सुरेश जारवाल, पोलीस बीटचे अधिकारी सिद्धार्थ सोनकांबळे, भरत फोफळे, वाहक महिला कर्मचारी यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. गणेश यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे.
2 thoughts on “मेरा बुद्रुक येथील युवा पोलीस कर्मचाऱ्याचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू!”