सिंदखेड राजा तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या; कर्जाच्या ओझ्याला कंटाळून आयुष्य संपवले

sucide chikhli

सिंदखेड राजा (सुरेश हुसे- बुलडाणा कव्हरेज न्यूज): शेतीतील सततचे नुकसान, नापिकी आणि कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे तणावाखाली असलेल्या एका अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुखद घटना सिंदखेड राजा तालुक्यात घडली आहे. कृष्णा झोरे (वय ४१) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले. ही घटना ३१ मे २०२५ रोजी उघडकीस आली.

कृष्णा झोरे हे एक मेहनती आणि साध्या स्वभावाचे शेतकरी होते. त्यांच्यावर चिखली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे सुमारे ५ लाख रुपयांचे कर्ज होते. याशिवाय, त्यांनी काही खाजगी सावकारांकडूनही कर्ज घेतले होते. गेल्या काही वर्षांपासून अनियमित पावसामुळे त्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. शेतीतून मिळणारे उत्पन्न खर्चाला पुरेसे नव्हते, त्यामुळे ते आर्थिक संकटात सापडले होते.

कृष्णा यांना शेतीच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे आणि कर्जाची परतफेड करणे यांचा ताण असह्य झाला होता. या दबावाला कंटाळून त्यांनी अखेर टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. ही बातमी गावात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला असून, गावकऱ्यांमध्येही शोककळा पसरली आहे.

या घटनेने शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. शासन आणि संबंधित यंत्रणांनी वेळीच शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिक आधार दिला असता, तर कदाचित कृष्णा झोरे यांच्यासारख्या मेहनती शेतकऱ्याचे आयुष्य वाचले असते, अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले आहे.

सिंदखेड राजा तालुक्यातील या घटनेने शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि मानसिक संकटांकडे समाजाचे लक्ष वेधले आहे. शेतकऱ्यांना सावरण्यासाठी ठोस पावले उचलणे ही काळाची गरज आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!