बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):
गेल्या दोन दिवसांपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीकविम्याची रक्कम जमा होऊ लागली आहे. मात्र या रकमेबाबत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारीच स्थिती दिसून येते. काही प्रमाणात मिळालेल्या पीकविमा रकमेवर आता सत्ताधारी नेते श्रेय घेण्यासाठी पुढे येत असल्याचे चित्र दिसत आहे.
जाहिरात….
मात्र खरा प्रश्न असा की, हा विमा शेतकऱ्यांना सहजासहजी मिळालेला नाही. शेतकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष केला, मोर्चे काढले, उपोषण केले, रात्रंदिवस रस्त्यावर उतरून सरकारला घेरलं. शेतकरी एकजुटीने उभा राहिला, त्याच्या आंदोलनाच्या ताकदीपुढे सरकारला झुकावं लागलं, शेतकऱ्यांना एकजूट करण्यात तुपकरांचा सिंहाचा वाटा..!
याच पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सत्ताधाऱ्यांना जोरदार टोला लगावला आहे. ते म्हणाले, “श्रेय कोणीही घ्या! पण हे यश फक्त शेतकऱ्यांच्या एकजुटीचं आहे आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं आहे.सत्ताधाऱ्यांनी यासाठी काहीही केलेलं नाही, तर शेतकऱ्यांनी केलेल्या संघर्षाचं हे फळ आहे.”
तुपकर पुढे म्हणाले की, “पीकविमा कंपन्यांनी काही प्रमाणात रक्कम दिली आहे. मात्र लाखो शेतकऱ्यांचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही. शेतकऱ्यांचा आवाज, त्यांचे आंदोलन हेच या लढ्याचे खरे शस्त्र ठरले. आज जरी अनेक शेतकऱ्यांना काही रक्कम खात्यात आली असली, भरपूर शेतकरी अजूनही वंचित आहेत त्यामुळे श्रेय घेण्यासाठी नेत्यांनी स्पर्धा लावू असा टोला तुपकरांनी लगावला आहे. जे काही थोडेबहुत यश मिळालं हे आम्हा शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं आहे.. राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी लढाई सुरूच राहणार अशी प्रतिक्रिया तुपकरांनी देत विम्याचे श्रेय घेणाऱ्या सत्ताधारी नेत्यांना चिमटे घेतले आहेत.













