बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):शासनाच्या रब्बी हंगाम २०२५ साठीच्या महत्त्वाकांक्षी ई-पीक पाहणी (डिजिटल क्रॉप सर्व्हे – DCS) उपक्रमाची अंमलबजावणी सुरू असली, तरी बुलडाणा जिल्ह्यात प्रत्यक्ष नोंदणीचा वेग अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे चित्र समोर आले आहे. १० डिसेंबर २०२५ पासून सुरू झालेल्या या उपक्रमाची अंतिम मुदत २४ जानेवारी असून, अद्याप मोठ्या प्रमाणावर क्षेत्र नोंदणीबाहेर असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात रब्बी हंगामांतर्गत सुमारे ८९ हजार ३४०.७५ हेक्टर क्षेत्रावर ई-पीक पाहणी अपेक्षित आहे. एकूण ७ लाख ९९ हजार १९५ मालकी प्लॉट्सपैकी आतापर्यंत केवळ ८० हजार ०२८ प्लॉट्सवरच पीक नोंदणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण नोंदणी केवळ ३९.३२ टक्के इतकीच झाल्याचे समोर आले आहे. उर्वरित क्षेत्रावर तातडीने नोंदणी होणे अत्यावश्यक आहे.
ई-पीक पाहणीसाठी DCS व्हर्जन ४.०.५ हे अॅप अँड्रॉइड मोबाईलवर डाउनलोड करून, शेतात जाऊन प्रत्यक्ष पीक नोंद करणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोनचा अभाव, नेटवर्क अडचणी किंवा अॅप वापरण्याची माहिती नसल्यामुळे नोंदणी रखडत आहे. अशा परिस्थितीत तलाठी, कोतवाल, कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) तसेच गावनिहाय नियुक्त सहाय्यकांची मदत घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ई-पीक पाहणी ही केवळ औपचारिक प्रक्रिया नसून, ती शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेशी थेट संबंधित आहे. ७/१२ उताऱ्यावर पीक नोंद न झाल्यास संबंधित पीकपेरा कोरा राहतो आणि नंतर त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही. परिणामी, पीकविमा, नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाई तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडथळे येऊ शकतात.
अवकाळी पाऊस, गारपीट किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीच्या वेळी अचूक ई-पीक नोंद हीच शेतकऱ्यांची सर्वात मोठी ढाल ठरते. त्यामुळे कोणतेही नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी २४ जानेवारीपूर्वी ई-पीक पाहणी पूर्ण करावी, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
ई-पीक पाहणी : जिल्ह्याची सद्यस्थिती..
अपेक्षित क्षेत्र : ८९,३४०.७५ हेक्टर
एकूण मालकी प्लॉट्स : ७,९९,१९५
नोंदणी पूर्ण प्लॉट्स : ८०,०२८
पूर्ण नोंदणी : ३९.३२ टक्के















