देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): लग्नाच्या आनंदी क्षणांना नियतीने काळ्या छायेने झाकोळले. आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. देऊळगाव राजा तालुक्यातील धोत्रा नंदई येथील डॉ. अमोल शिवानंद मुंढे (वय २७) यांचा अपघातानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. १३ जुलै २०२५ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथे त्यांचा विवाह ठरला होता. मात्र, हळदीच्या दिवशीच कुटुंबीयांवर अंत्यसंस्काराची वेळ आली. या घटनेने गावात आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
डॉ. अमोल अमरावती जिल्ह्यातील भुईखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांचे लग्न ठरले होते आणि घरात आनंदाचे वातावरण होते. लग्नाची तारीख जवळ येत असल्याने सर्व तयारी जोरात सुरू होती. डॉ. अमोल स्वतः लग्नपत्रिका वाटपापासून ते इतर तयारीत उत्साहाने सहभागी होते. मात्र, २३ जून रोजी त्यांच्यावर काळाने घाला घातला. तळेगाव येथील आरोग्य केंद्रात गंभीर रुग्णावर उपचार करण्यासाठी ते दुचाकीवरून निघाले होते. त्याचवेळी एका अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात अमोल गंभीर जखमी झाले. वेळीच वैद्यकीय मदत न मिळाल्याने त्यांना प्रचंड रक्तस्त्राव झाला. त्यांना तातडीने नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, पण ११ जुलै रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
लग्नाच्या केवळ वीस दिवस आधी घडलेल्या या घटनेने डॉ. अमोलच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. हळदीचा सोहळा आणि लग्नाच्या तयारी याऐवजी अंत्यसंस्काराची तयारी करावी लागली. गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि मनात हळहळ होती. अमोल हे गावातील एक हुशार आणि कर्तव्यदक्ष तरुण म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या अकाली निधनाने गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.













