चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) – बेराळा फाटा येथे उभ्या असलेल्या ट्रकमधून डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा चिखली पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या आरोपींकडून सुमारे ₹२.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
घटनेची माहिती अशी की, २७ ऑक्टोबर रोजी मोहित हार्डवेअर दुकानासमोर ट्रक क्रमांक MH-48-AY-4066 चालकाने ३१ टन सिमेंट उतरवून उभा ठेवला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २८ ऑक्टोबरच्या रात्री, ट्रकचालक ट्रकमध्ये झोपलेला असताना काही चोरट्यांनी ट्रकच्या टाकीचे झाकण उघडून ७० लिटर डिझेल (किंमत ₹६,३७०) चोरी केले.
जाहिरात ☝️
या प्रकरणी चालकाने चिखली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पो.उप.नि. समाधान वडणे यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी संशयितांची चौकशी केली असता, हर्षद पाडुरंग साबळे (२५) आणि अनिकेत ऊर्फ अनिल शाम श्रीमंत (१९) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी आपल्या इतर साथीदारांची नावे उघड केली.
यानुसार पोलिसांनी पुढील आरोपी स्वप्नील प्रदीप जाधव (२८), विनोद ऊर्फ बबलू मोहन मंजुळकर (३३) आणि संजय उत्तम शिवनकर (४३) यांनाही अटक केली. चौकशीत आरोपींनी चोरी केलेले डिझेल शिनगाव जहागीर (ता. दे. राजा) येथे विकल्याचे कबूल केले.
पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून सुमारे ३० लिटर डिझेल, दोन कॅन आणि इतर साहित्य असा एकूण ₹२,५५,७६० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या पाचही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना बुलडाणा कारागृहात न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले.
चिखली पोलिसांच्या तात्काळ आणि अचूक कारवाईमुळे डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा भांडाफोड करण्यात यश आले आहे.












