धाड (बुलडाणा कव्हरेज न्यूज): धाड ग्रामपंचायतीमध्ये तब्बल तीन कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसेवकासह स्वतःला ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून घेतले. ही घटना १ ऑगस्ट रोजी दुपारी घडली. यावेळी ग्रामसेवक विष्णू इंगळे हे कार्यालयात कार्यरत होते.
महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट: विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता, मॉन्सून कमजोर
ग्रामपंचायत सदस्य रिझवान सौदागर आणि इतर सदस्यांनी आरोप केला की, पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून डस्टबिन खरेदी, धूर फवारणी आणि घनकचरा व्यवस्थापन यासाठी निधी काढण्यात आला; मात्र, प्रत्यक्षात कोणतेही काम झाले नाही आणि संबंधित खर्चाचे कोणतेही स्पष्ट विवरण देण्यात आले नाही.
“ग्रामसेवकाकडे माहिती मागितली असता ती मिळाली नाही,” असा दावा सदस्यांनी केला. त्यामुळे संतप्त झालेल्या सदस्यांनी ग्रामसेवक इंगळे यांच्यासह स्वतःलाही कार्यालयात कोंडून घेतले आणि कारवाईची मागणी केली. या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
सायंकाळपर्यंत आंदोलन सुरूच होते. दरम्यान, गटविकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीची माहिती घेतली.
ग्रामसेवक विष्णू इंगळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मी काही दिवसांपूर्वीच येथे बदली होऊन आलो आहे. त्यामुळे आधीच्या कारभाराची मला माहिती नाही.”