देऊळगाव मही (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथे चोरट्यांनी एकाच रात्री पाच घरं आणि एका किराणा दुकानाला लक्ष्य करत लाखोंचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चोरीमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि दुकानातील माल असा मिळून लाखोंचा मुद्देमाल चोरला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी शहरातील विविध भागांतील घरं आणि दुकानांना निशाणा बनवलं. यापैकी मथुराबाई मधुकर शिंगणे यांच्या घरात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी कुलूप तोडून प्रवेश केला. मथुराबाई झोपेत असताना चोरट्यांनी त्यांच्या कानातील सोन्याच्या बाळ्या जबरदस्तीने काढून घेतल्या. या झटापटीत मथुराबाई यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर चोरटे तातडीने पसार झाले.

दुसऱ्या एका घटनेत, शशिकला किसन खिल्लारे यांच्या घरात चोरट्यांनी शिरकाव करत शिवण पिशव्या, झुंबड आणि १५ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. याच रात्री मंदा खेत्रै यांच्या किराणा दुकानातही चोरट्यांनी चोरी केली. त्यांनी दुकानातून अंदाजे १२ हजार रुपयांचा किराणा माल आणि ५,५०० रुपये रोख रक्कम लंपास केली.
या सर्व घटनांची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे. दरम्यान, या चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी संतप्त नागरिकांकडून केली जात आहे.











