दुःखत बातमी..! काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी यांचा रेल्वे अपघातात मृत्यू
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – चिखली तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, बाजार समितीचे माजी सभापती तसेच पैठण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी डॉ. सत्येंद्र भुसारी (रा. भोरसा भोरशी, ता. चिखली) यांचा १२ नोव्हेंबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास कासारा रेल्वे स्टेशनवर झालेल्या अपघातात मृत्यू झाला.
या घटनेची बातमी समजताच चिखली तालुक्यात शोककळा पसरली आहे.
डॉ. भुसारी यांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सामाजिक चळवळीतून समाजसेवा सुरू केली होती. नंतर ते काँग्रेस पक्षात दाखल झाले. नुकतीच त्यांची पैठण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. मुंबईत पक्षाच्या बैठकीसाठी ते जात असल्याचे समजते. मात्र अपघात नेमका जाताना झाला की परतताना, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कासारा रेल्वे स्टेशनवर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने मानवता हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक वाघ यांनी दिली.
घटनास्थळी गाडी थांबत नव्हती, त्यामुळे अपघात कसा घडला याचा तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच माजी आमदार राहुल बोंद्रे हे मुंबईहून घटनास्थळी रवाना झाले, तर उदयनगरचे सरपंच मनोज लाहुडकर सुद्धा तातडीने तेथे पोहोचले. आमदार श्वेताताई महाले पाटील यांचे पती विद्याधर महाले यांनीही कासारा येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक मदतीच्या सूचना दिल्या.
डॉ. भुसारी यांच्या आकस्मिक निधनाने चिखली तालुका तसेच जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.















