लोणार (दिपक कायंदे- बुलढाणा कव्हरेज न्यूज): लोणार तालुक्यातील चिंचोली सांगळे येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला एक सुंदर आणि विस्तीर्ण लाल मातीचे मैदान तयार करण्यात आले आहे. या मैदानाच्या निर्मितीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी आणि शारीरिक शिक्षणासाठी एक उत्तम जागा उपलब्ध झाली आहे. या उपक्रमात शाळेच्या शिक्षकांसह गावकरी, ग्रामपंचायत आणि शालेय व्यवस्थापन समितीने मोलाचे योगदान दिले आहे.
सिंदखेडराजा शहरात पाणीटंचाईने नागरिक हैराण, नगर परिषदेला निवेदन सादर
या प्रकल्पाचे यशस्वी नियोजन आणि अंमलबजावणी केंद्रप्रमुख रामप्रसाद कायंदे, उच्च श्रेणी मुख्याध्यापक संजय जायभाये आणि शाळेतील सर्व शिक्षकांनी केली. त्यांना सरपंच सुनिताताई घुगे, उपसरपंच रवी सुटे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्ता चाटे, उपाध्यक्ष हनुमान आघाव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, समिती सदस्य, गावकरी आणि पालकांनी सक्रिय साथ दिली. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे मैदान तयार होऊ शकले.
नव्याने तयार झालेल्या लाल मातीच्या मैदानावर विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने खेळण्याचा आनंद लुटला. मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि त्यांचा उत्साह पाहून हा उपक्रम किती यशस्वी ठरला, याची प्रचिती आली. हे मैदान मुलांना केवळ खेळण्यासाठीच नव्हे, तर त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठीही उपयुक्त ठरणार आहे.
हा उपक्रम चिंचोली सांगळे गावातील शैक्षणिक प्रगती आणि सामुदायिक सहभागाचे उत्तम उदाहरण आहे. अशा प्रकारच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील शाळांचा दर्जा सुधारण्यास निश्चितच मदत होईल.