चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): श्रावण सोमवारी देवपूजेसाठी बेलपान विक्री करणाऱ्या गजानन साळवे या विक्रेत्याला बाजार कर वसुलीच्या वादातून दोन जणांनी मारहाण केल्याची घटना ४ ऑगस्ट रोजी चिखली शहरातील राजा टॉवर परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
घटनेचा तपशील असा की, गजानन साळवे (रा. खंडाळा, ता. मकरध्वज) हे श्रावण महिना आणि इतर सण-उत्सवांच्या काळात फुले व बेलपान विक्री करून आपली उपजीविका चालवतात. ४ ऑगस्ट रोजी त्यांनी राजा टॉवर परिसरात आपले दुकान लावले होते.
सकाळी साडेअकराच्या सुमारास, बाजार कर वसुली करणारे मो. इकबाल मो. रफिक व अब्दुल रफिक अब्दुल मतीन हे तेथे आले आणि त्यांनी साळवे यांच्याकडे कराची मागणी केली. साळवे यांनी “थोड्या वेळाने देतो, आत्ता पैसे नाहीत” असे सांगितल्यावर, दोघांनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. एवढेच नाही, तर गोनपाटावर ठेवलेल्या पवित्र बेलपानांना लाथा मारत दुकान उचलून टाकण्याची धमकी दिली.
या घटनेमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप साळवे यांनी केला आहे. त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत तातडीने कारवाईची मागणी केली. परिणामी, चिखली नगरपालिकेने संबंधित बाजार कर वसुली कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.