चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) शहरातील काही खासगी रुग्णालयांकडून बुलढाणा मार्गालगतच धोकादायक जैविक कचरा उघड्यावर टाकला जात असल्याचे उघड झाले आहे. या कचऱ्यामध्ये वापरलेल्या सुया, औषधांच्या रिकाम्या बाटल्या, सलाइन बॉटल्स आणि इतर वैद्यकीय साहित्याचा समावेश आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
हा केवळ कचरा नसून, तो संसर्ग पसरवणारे ठिकाण ठरू शकतो. यातून एचआयव्ही, हिपॅटायटिस बी आणि सी सारखे गंभीर आजार पसरण्याची शक्यता आहे. याचा परिणाम सफाई कामगार, भटकी जनावरे आणि लहान मुलांवर होऊ शकतो.
विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शहरात साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
भारत सरकारने लागू केलेल्या ‘जैविक कचरा व्यवस्थापन नियम २०१६’ नुसार प्रत्येक रुग्णालयाला त्यांच्या ठिकाणी निर्माण होणारा कचरा अधिकृत केंद्राकडे शास्त्रोक्त पद्धतीने जमा करणे बंधनकारक आहे. तसेच कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून त्यावर लेबल लावणे आवश्यक असते.
या नियमांचे उल्लंघन करणे हा गंभीर गुन्हा असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दोषी रुग्णालयांवर कठोर कारवाई करू शकते आणि त्यांचे परवाने रद्द करण्याची तरतूद आहे. मात्र, काही रुग्णालये खुलेआम कायद्याचे उल्लंघन करत सार्वजनिक आरोग्याला धोक्यात घालत आहेत.
हा कचरा जमिनीत मिसळून जलस्त्रोतांचे प्रदूषण करतो आणि पर्यावरणालाही हानी पोहोचवतो. त्यामुळे या प्रकारावर तातडीने कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
















