चिखली(उध्दव पाटील: बुलडाणा कव्हरेज न्युज) शहरात सध्या नगरपरिषद निवडणुकीचा ताप चांगलाच चढलेला असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर नगरपरिषदेसाठी रणनीती आखत अनेकांनी पक्षांतरे केली. यात काही नवोदितांपासून तर काही निष्ठावंत कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांना उमेदवारीची लॉटरी लागली आहे. मात्र ज्यांच्या वाट्याला तिकीट आले नाही, त्यांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारल्याचे चित्र आहे.काही नाराज इच्छुकांनी तिसऱ्या आघाडीत प्रवेश करून उमेदवारी घेतली असताना, काही जण घरातच राहून सामाजिक माध्यमांवरून मार्मिक टीका करण्याच्या भूमिकेत दिसत आहेत. तर काही नाराज कार्यकर्ते स्वपक्षाच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी गुप्त पद्धतीने उपाययोजना आखत असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.या सर्व घडामोडींमुळे शहरातील राजकारण अधिक तीव्र होत असून सुडाचे राजकारण शिगेला पोहोचल्याचे चित्र उमटत आहे. निष्ठावंत विरुद्ध उपरे, जुने विरुद्ध नवखे असा संघर्ष निर्माण झाला आहे. पक्षश्रेष्ठींनी केलेले तिकिट वाटप आणि त्यानंतर उद्भवलेल्या नाराजीतून निवडणुकीच्या वातावरणात चुरस अधिक वाढली असून आगामी दिवसांत अजून नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या राजकीय घडामोडींच्यार पार्श्वभूमीवर आगामी चिखली नगरपरिषद निवडणूक अत्यंत रोचक होणार असून मतदारांनी कोणाकडे झुकते माप द्यावे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चिखली नगरपरिषद निवडणूक : उमेदवारीवरून पक्षांतरे, बंडखोरी आणि सुडाच्या राजकारणाला ऊत













