चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) —
गल्ली ते दिल्ली पर्यंत विरोधात असलेल्या महाविकास आघाडीने नगरपालिका, पंचायतसमित्या आणि जिल्हापरिषदेची निवडणूक एकत्रीत लढण्याचे संकेत दिले असल्याने कॉग्रेसचे जिल्ह्याध्यक्ष माजी आमदार राहुल बोद्रे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी ह्या निवडणूकिला सामोरे जाणार असल्याचे आघाडीतील सर्वच पक्ष कार्यकर्त्या कडून सांगण्यात येते तर राज्यात आणि केंद्रात एकत्र सत्तेत असलेली महायुतीचे नेते मात्र चिखली नगरपरिषद निवडणुक एकत्र लढता स्वतंत्र लढाईसाठी सज्ज झाले आहे. भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवारीची तयारी सुरू केल्याने चिखलीत राजकीय रंगत चांगलीच वाढली आहे.
विरोधी पक्षातील महाविकास आघाडी (काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार) यांनी जिल्हास्तरीय बैठका घेऊन एकत्र लढण्याचा निर्णय घेतला असताना, सत्ताधारी महायुती मात्र "आपापल्या बळावर" मैदानात उतरत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
🔸 भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू…
भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्ष पदासह नगरसेवकपदासाठी इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे. शहराध्यक्ष सागर पुरोहित यांनी सांगितले की, “पक्षश्रेष्ठीच्या निर्णयाला आम्ही बांधील आहोत. मात्र सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न सुरू आहे.”
🔸 शिवसेना (शिंदे गट)कडून थेट प्रचाराचा शुभारंभ..
शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे शहरप्रमुख विलास घोलप यांनी स्वतःची नगराध्यक्ष पदासाठीची उमेदवारी जाहीर करून प्रचाराला थेट सुरुवात केली आहे.
त्यांनी सांगितले की, “मुंबईतील पश्चिम विदर्भ विभागाच्या बैठकीत नेते श्रीकांत शिंदे यांनी काही निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यास सांगितले आहेत. त्यामुळे आम्ही चिखली नगरपरिषदेची निवडणूक स्वतंत्र लढणार आहोत.”
🔸 राष्ट्रवादी (अजित पवार गट)कडून स्वतंत्र तयारी…
राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) चे नेते शंतनु बोंद्रे यांनी नुकतीच चिखली येथे बैठक घेऊन घोषणा केली की, “आम्ही नगरपरिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वतंत्रपणे लढण्यासाठी सक्षम आहोत.”
त्यांनी पुढे सांगितले की, “लवकरच पालकमंत्री महोदयांसोबत याबाबत बैठक होणार आहे. त्यानंतर आमची अधिकृत भूमिका जाहीर केली जाईल.
🔸 सणासुदीतच प्रचाराची रणधुमाळी..
दिवाळीच्या सणासुदीत या तिन्ही पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी घरोघरी भेटीगाठी घेऊन मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याआधीच शहरात जणू निवडणूक प्रचाराचा माहोल निर्माण झाला आहे.
एकंदरीत पाहता, महाविकास आघाडी एकत्र येऊन लढण्याचा प्रयत्न करत असताना, महायुती मात्र एकमेकांविरुद्ध शंडू ठोकून मैदानात उतरत असल्याचे चिखलीत स्पष्ट दिसत आहे.
यामुळे येणारी नगरपरिषद निवडणूक अधिकच रंगतदार होणार, हे निश्चित!













