चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):शेवटी ‘नाही…. हो.., नाही…. हो’ म्हणता-म्हणता भाजप,कॉग्रेसने तिकीट वाटपाचा पेच सोडवला… पण ज्यांना तिकीट मिळालं नाही, त्यांनी “तिसऱ्या आघाडीत जमवलं” , ज्याचं कुठच जमलं नाही ते घरात बसले अशी जोरदार चर्चा चिखली नगरपालिका निवडणुकीसंदर्भात चिखली तालुक्यात दिवसभर रंगली.नगराध्यक्ष पदासाठी गेल्या काही दिवसांपासून काही उमेदवार “गुडघ्याला बाशिंग बांधून” बसलले होते. तिकीट मिळण्या अगोदरच इच्छुकांनी आपल्या समर्थकासह शहरातील घोरघर फिरून मतदारांचे आशीर्वाद घेतले . आज सकाळपासूनच आपल्याला आपल्या स्वताच्या पक्षात तिकीट मिळेल की नाही याबाबद अनेक जण साशंक होते त्यामुळे इतरत्र राजकीय ‘मेळ लावणे’ सुरू होते. फोन, बैठका, चर्चा, संताप, आशा-निराशा… असं संपूर्ण शहरात वातावरण धगधगत होतं.दिवसभर एका पक्षाची निष्ठा जपणारे अनेक कार्यकर्ते संध्याकाळपर्यंत कुठल्या पक्षात गेले, कुठून AB फॉर्म घेतला, कुणाचा अर्ज भरला,ही माहिती त्यांच्या घरच्यांनासुद्धा कळेना. भाऊ अर्ज घेऊन परत आल्यावरच समजलं की “भाऊ गेले तिकडे!”कोणी काँग्रेस सोडली, कोणी भाजप, कोणी राष्ट्रवादीकडे झुकलं… अशा राजकीय ‘कुस्ती’त आजचा पूर्ण दिवस गेला. तिकीटाच्या राजकारणात निष्ठेपेक्षा गणितं आणि संधी कशी जास्त महत्त्वाची ठरतात याचं चित्र चिखलीत स्पष्ट दिसलं…. कॉग्रेस आणि भाजपा या दोन मुख्य पक्षाकडे इच्छुकांची भाऊ गर्दी होती तर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष आणि दोन्ही शिवसेना यांच्याकडे उमेदवाराची चणचण होती.भाजपने ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा मनसुबा आखला होता तर राष्ट्रवादी (अजीदादा गट) आणि शिंदे सेना या मित्रपक्षांला वाऱ्यावर सोडून भाजपने निवडणुक स्वबळावर लढण्याचे ठरवल्याने त्यांची चांगलीच गोची झाली तर कॉग्रेसच्या राहुल बोद्रे यांनी मात्र मित्रपक्षाची किंमत करीत राष्ट्रवादी( शरद पवार गट) आणि शिवसेना उबाठा गटाला जागा देऊन मित्रपक्षाच्या मताचे ध्रुवीकरण टाळले.या प्रमुख दोन्ही पक्षातील ज्या इच्छुकांना तिकीट मिळाले नाही त्यांना घेऊन निलेश गावंडे यांनी शिवसेना( शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजितदादा गट) या दोन्ही पक्षाचे AB फार्मचे वाटप केले आणि तिसरी आघाडी उभी करून चिखलीच्या निवडणुकीचे रणशिंग फुकले.ही निवडणूकित तिसरी आघाडी कुणाला मारक ठरते की स्वतः यश संपादन करते हे येणारा काळच ठरवणार आहे.
सुटला राजकीय पेच, उडाली धांदल! चिखली नगराध्यक्ष तिकीटावरून दिवसभर राजकीय कल्लोळ ….. निष्ठावंतांनाही बदलली बाजू, अर्ज भरताना उघड झालं सगळंच!भाऊ अर्ज घेऊन आल्यावरच समजलं की “भाऊ भुर्र उडून गेले तिकडे!”














