चिखलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लवकरच उभारणार; विधीवत पूजेनंतर जुन्या पुतळ्याचे स्थानांतरण

चिखलीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लवकरच उभारणार; विधीवत पूजेनंतर जुन्या पुतळ्याचे स्थानांतरण

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून चिखली शहरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा लवकरच उभारला जाणार आहे. हा नवीन पुतळा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्थापित होणार आहे, जिथे 1985 मध्ये चिखली नगरपालिकेने शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा उभारला होता. या नवीन पुतळ्याच्या स्थापनेसाठी जुन्या पुतळ्याचे स्थानांतरण करण्याच्या प्रक्रियेला नुकतीच सुरुवात झाली आहे. ही प्रक्रिया विधीवत पूजा आणि अभिषेकाने संपन्न झाली असून, यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सागर पुरोहित यांच्या उपस्थितीत चिखलीकरांनी शिवस्मृतीचा अनुभव घेतला.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून सर्व आवश्यक प्रशासकीय मान्यता मिळवल्या. शिवाय, या भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीसाठी 50 लाख रुपयांचा निधीही त्यांनी मंजूर करवला. चिखली शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आणि शिवप्रेमींच्या मनात अभिमान निर्माण करणारा हा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव चिखलीकरांच्या आग्रहामुळे आणि आमदारांच्या विशेष आस्थेमुळे प्रत्यक्षात येत आहे. जिल्हास्तरीय पुतळा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी यासंदर्भातील पत्र नगरपालिकेला पाठवून जुन्या पुतळ्याचे स्थानांतरण करण्याचे निर्देश दिले होते.

या निर्देशानुसार, चिखली नगरपालिकेने जुन्या पुतळ्याचे स्थानांतरण करण्याची प्रक्रिया सुरू केली. या प्रक्रियेला सुरुवात करण्यापूर्वी आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या सूचनेनुसार, भारतीय जनता पक्ष आणि शहराध्यक्ष सागर पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्या पुतळ्याची विधीवत पूजा आणि अभिषेक करण्यात आला. यानंतर पुतळा अत्यंत काळजीपूर्वक खाली उतरवण्यात आला. पुतळ्याखालील चौथऱ्याचे नव्याने बांधकाम केले जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवीन अश्वारूढ पुतळ्याची स्थापना या जागी होईल.

या नवीन अश्वारूढ पुतळ्याची उंची 15 फूट असून, त्याचे वजन 2200 ते 2300 किलोग्रॅम इतके आहे. हा पुतळा पूर्णपणे ब्राँझ धातूपासून बनवला जाणार असून, पुण्यातील करहा स्टुडिओ येथील प्रसिद्ध शिल्पकार ललित धनवे यांनी इटलीतील नामांकित शिल्पकला कंपनी एफएए यांच्या सहकार्याने आणि शिल्पकार प्रसाद मोडक यांच्या सहाय्याने हा पुतळा साकारला आहे. यावरील चित्रकला सौ. कविता देशमुख यांनी रेखाटली आहे.

या कार्यवाहीदरम्यान तहसीलदार संतोष काकडे, नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता दीपक चिंचोले यांच्यासह शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सुरेश अप्पा कबुतरे, प्रतापसिंह राजपूत, शंतनू बोन्द्रे, पंडितदादा देशमुख, रामदास देवडे, कृष्णकुमार सपकाळ, सुरेंद्र पांडे, शैलेश बाहेती, सुहास शेटे, सुदर्शन खरात, बंडूभाऊ खरात, प्रा. वीरेंद्र वानखेडे, विजय नकवाल, योगेश झगडे, सिद्धेश्वर ठेंग, विजय कऱ्हाडे, रेणुकादास मुळे, भारत दानवे, चेतन देशमुख, युवराज भुसारी, सुधीर तांबट, निलेश अंजनकर, अरुण सोनवणे, दीपक लहाने, दत्ता सुसर, संजय अतार, बाळू हांडगे, तुषार भावसार यांच्यासह अनेक मान्यवर नागरिक आणि भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

या नवीन पुतळ्याच्या स्थापनेमुळे चिखली शहरातील शिवप्रेमींचे स्वप्न पूर्ण होणार आहे. हा पुतळा केवळ शहराच्या सौंदर्यवृद्धीसाठीच नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या प्रेरणादायी स्मृतींना उजाळा देण्यासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!