मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) मेहकर नगर परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. फक्त वीस दिवस बाकी असतानाच राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस आणि शिवसेनेत उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. काँग्रेसमध्ये दोन गटांमध्ये तर शिवसेनेत तब्बल तीन इच्छुकांमध्ये उमेदवारीसाठी संघर्ष सुरू आहे. त्यामुळे कोणाला उमेदवारीचे “बलिदान” द्यावे लागणार, हे काही दिवसांत स्पष्ट होईल.दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून किशोर गारोळे यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे, मात्र अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. तरीसुद्धा सर्वच इच्छुकांनी आपापल्या पातळीवर प्रचाराला सुरुवात केली आहे.आठ वर्षांनंतर मेहकर नगर परिषदेची निवडणूक होत आहे. कार्यकाळ संपून जवळपास साडेतीन वर्षे उलटली आहेत. या काळात नागरिकांना अधिकाऱ्यांच्या मनमानीचा सामना करावा लागला. त्यामुळे नागरिकांना आता आपला विचार असलेला, लोकांमध्ये काम करणारा उमेदवार हवा आहे, अशी भावना दिसते.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकत्याच झालेल्या सभेत स्पष्ट सांगितले की, “उमेदवारीसाठी कोणाला तरी कुर्बानी द्यावी लागेल, तेव्हाच तिढा सुटेल.” त्यामुळे काँग्रेसमध्ये कोण माघार घेणार, हे बघणे उत्सुकतेचे ठरेल.शिवसेना शिंदे गटाकडून सुरेश वाळूकर, अजय उमाळकर आणि जयचंद बाठिया ही नावे चर्चेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार उमाळकर यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून अधिकृत एबी फॉर्म मिळेपर्यंत पक्षाचा अंतिम निर्णय स्पष्ट होणार नाही.काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष कासम गवळी आणि माजी नगराध्यक्ष विलासराव चनखोरे या दोघांच्या नावाची चर्चा रंगली आहे. दोघांनीही स्वतंत्रपणे प्रचाराला सुरूवात केली आहे.सर्व घडामोडींचा वेग पाहता, मेहकर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता स्पष्ट झाली आहे. आता नगराध्यक्ष पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
मेहकर नगर परिषद निवडणूक : काँग्रेस-शिवसेनेत उमेदवारीवरून रस्सीखेच; तिरंगी लढतीची चिन्हे स्पष्ट!














