बुलढाणा, (बुलढाणा कव्हरेज न्यूज): भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा केवळ एक राजकीय पक्ष नसून, स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणा आणि देशभक्तीचा जागर आहे. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात काँग्रेसने राष्ट्रीय जागृती घडवून आणली आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. काँग्रेसने नेहमीच आपल्या विचारधारेला आणि तत्त्वांना जपले आहे. विकास, स्थिरता आणि लोककेंद्रित धोरणांमुळे जनतेचा काँग्रेसवरील विश्वास वाढत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष पूर्णपणे सज्ज झाला आहे, असा ठाम विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.
अनुकंपावरील दहा हजार पदे भरणार; उमेदवार नियुक्तीचे अधिकार जिल्ह्याधिकाऱ्यांचे
सोमवार, २१ जुलै २०२५ रोजी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सर्व आजी आणि माजी ब्लॉक अध्यक्षांची एक महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, जनतेचा कल पुन्हा काँग्रेसकडे वळत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले असून, यापुढील निवडणुकांमध्येही काँग्रेस पक्ष मोठी मुसंडी मारेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, “देशात लोकशाही टिकवायची असेल, तर काँग्रेस हाच खरा पर्याय आहे. गेल्या सत्तर वर्षांत काँग्रेसने देशाच्या विकासासाठी केलेले योगदान जनतेला आता पुन्हा समजू लागले आहे. ‘सत्तर वर्षांत काँग्रेसने काय केले?’ असा प्रश्न विचारणाऱ्यांना आता जनता उत्तर देऊ लागली आहे.”
या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीवर सविस्तर चर्चा झाली. पक्ष संघटनेला बळकटी देणे, स्थानिक पातळीवरील प्रश्नांना प्राधान्य देणे आणि प्रचाराचे प्रभावी नियोजन यावर विशेष भर देण्यात आला. सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करून पक्षाला यश मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रसंगी भगवान धांडे, राजेश मापारी, देवानंद पवार, अतरोधीन काजी, अविनाश उमरकर, भाऊराव भालेराव, कैलास देशमुख, रामभाऊ जाधव, राहुल सवडतकर, निना इंगळे, ज्ञानेश्वर शेजोळ, अनिल भारंबे, रामदास डोईफोडे, आतिष कासारे, बंडू चौधरी, समाधान सुपेकर, सुनिल तायडे, तेजेंद्रसिंह चौहान, पंकज हजारी, राजू वानखेडे, प्रदीप देशमुख, रहेसखा जमदार, राजू पाटील, शेख समेद, आश्रु फुके, किशोर भोसले, सतीश टाकळकर, प्रवीण कदम, रहिसखा यांच्यासह जिल्ह्यातील अनेक अनुभवी आजी-माजी ब्लॉक अध्यक्ष उपस्थित होते.
बुलढाण्यात काँग्रेस पुन्हा बळकट होईल : राहुल बोंद्रे
बुलढाणा जिल्हा हा काँग्रेसचा पारंपरिक गड राहिला आहे. या मातीतून अनेक दिग्गज नेते महाराष्ट्राला मिळाले आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे नेतृत्व पक्षाला लाभले आहे, ही बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीच्या जोरावर बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस पुन्हा भक्कमपणे उभारी घेईल, असा विश्वास जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी व्यक्त केला. त्यांनी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जोमाने कामाला लागण्याचे निर्देश दिले.
या बैठकीतून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा आणि उत्साह संचारला आहे. आगामी निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचा संकल्प केला आहे. बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित करेल, असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.