भरोसा (अंकुश थुट्टे – बुलडाणा कव्हरेज न्युज) – भरोसा शिवारातील वरली मटका आणि जुगार खेळल्या जाणाऱ्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (दि. १२ जुलै) धाड टाकून तिघा जुगाऱ्यांना अटक केली. तर, तिथून आणखी तिघे जुगारी फरार झाले.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. छापादरम्यान वरली मटक्याचे साहित्य, जुगाराचे पत्ते आणि एक दुचाकी असा एकूण ६८ हजार ३४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही धाड गुन्हे शाखेचे पोलिस हेडकॉन्स्टेबल गजानन दराडे, जगदेव टेकाळे आणि दिगंबर कपाटे यांच्या पथकाने टाकली. या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल कपाटे यांच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.











