मेरा बु. (कैलास आंधळे- बुलडाणा कव्हरेज न्यूज): कपाशीचे वखरणीचे काम करून बैलगाडीने घरी जात असलेल्या शेतकऱ्याला अडवून काठी व चापटा-बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना मंगरूळ येथे ७ ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगरूळ येथील रामदास ओकार आप्पा बांडे (५०) हे ७ ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास रवी गवते यांच्या शेतातील कपाशीचे वखरणीचे काम पूर्ण करून बैलगाडीने गोठ्याकडे जात होते. नर्मदा विद्यालयाजवळ लक्ष्मण ओकार बांडे आणि दगडू गोविंदा देवमाने हे मोटारसायकलवर आले.
“तू आमच्या अंगावर बैलगाडी का घालत होतास?” असा जाब विचारत लक्ष्मण बांडे यांनी बैलगाडीतील काठी काढून रामदास बांडे यांच्या दंडावर मारहाण केली. त्यानंतर कल्याणी बांडे हिने मोटारसायकल आडवी लावून शिवीगाळ केली, तसेच लक्ष्मण बांडे यांनी चापटा-बुक्क्यांनी पुन्हा मारहाण केली.
यानंतर शेतात बैलगाडी ठेवून परत जात असताना पवन बांडे हा शेतात येऊन काठीने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी लक्ष्मण ओकार बांडे, कल्याणी लक्ष्मण बांडे आणि पवन लक्ष्मण बांडे (सर्व रा. मंगरूळ) यांच्यावर भा.दं.वि.च्या कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२(५) BNS अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.