चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणत कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी स्थापन केलेल्या विविध महाविद्यालयांची यशस्वी घोडदौड सुरू आहे. अनुराधा फार्मसी ग्रुपच्या अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी चिखली आणि पी.आर.एम.एस .एस.अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी चिखली यांना आता महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडून सर्वोत्कृष्ट दर्जा प्राप्त झाल्याने अनुराधा परिवाराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेला आहे, हे विशेष…!
मुंबई शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 211 गट-डी पदांसाठी भरती सुरू, अर्ज कसा करावा?
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडून महाविद्यालयांचे दरवर्षी बाह्य मूल्यांकन केले जाते. या मूल्यांकनाच्या आधारे महाविद्यालयांची पाच श्रेणींमध्ये वर्गवारी केली जाते: १) वाईट, २) समाधानकारक, ३) चांगले, ४) उत्कृष्ट आणि ५) अत्युत्कृष्ट. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या संस्था निरीक्षण अहवालानुसार, अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी, चिखली (११३३) आणि पी.आर.एम.एस.एस. अनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी, चिखली (११५८) या महाविद्यालयांना महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने सर्वोच्च म्हणजेच अत्युत्कृष्ट दर्जा बहाल केला आहे.
तंत्र शिक्षण मंडळाच्या मूल्यांकन प्रक्रियेत महाविद्यालयातील सुविधा, नियमित लेखी आणि प्रात्यक्षिक वर्ग, प्लेसमेंट, परीक्षा निकाल, पेपर प्रेझेंटेशन, क्विझ, एम.एस.बी.टी.ई. स्पर्धा, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम, संशोधनातील सहभाग, परीक्षा केंद्र आणि विभागीय मूल्यांकन केंद्र यासारख्या विविध बाबींचा विचार केला जातो. या सर्व निकषांच्या आधारे मूल्यांकन करून पाच वेगवेगळ्या श्रेणींमध्ये मानांकन दिले जाते. या निकषांवर आधारित अनुराधा फार्मसी ग्रुपच्या दोन्ही महाविद्यालयांना अत्युत्कृष्ट दर्जा प्राप्त झाला आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे यांनी सर्व विश्वस्त मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास बियाणी, डॉ. काळे, डॉ. पागोरे, डॉ. बिहानी, विभाग प्रमुख प्रा. कुळकर्णी, डॉ. सचिन काळे यांच्यासह सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
“सर्वोत्कृष्ट दर्जा मिळणे ही अभिमानाची बाब” : राहुल भाऊ बोंद्रे
जिल्ह्यातील शिक्षणातील कमतरता दूर करण्यासाठी कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी दूरदृष्टीने अनुराधा परिवाराची मुहूर्तमेढ रोवली. आजपर्यंत या संस्थेतून हजारो विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यात संस्था नेहमीच पुढे राहिली आहे. अनुराधा फार्मसी ग्रुपला हा उत्कृष्ट दर्जा मिळणे ही खरोखरच गर्वाची बाब असून, भविष्यातही यशाची ही परंपरा कायम राहील, असे मत चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी व्यक्त केले.