मेरा खुर्द (बुलडाणा कव्हरेज न्युज): “सद्रक्षणाय खलनिग्रहाय” हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे उच्चाटन हेच काम पोलिसांकडून अपेक्षित असते. राज्यातील बहुतेक पोलीस अधिकारी व कर्मचारी या ब्रीदवाक्याला न्याय देतात, त्यामुळेच महाराष्ट्र पोलीस देशभरात अग्रस्थानी आहेत. पण दुर्दैवाने, काही मोजके कर्मचारी आपल्या वागणुकीमुळे संपूर्ण पोलिस यंत्रणेच्या प्रतिमेला धक्का पोहोचवत आहेत.
सध्या बुलडाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस स्टेशन ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या कामगिरीमुळे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या गुडबुकमध्ये आहे. मात्र ही प्रतिमा कायम ठेवायची असेल, तर शक्करगे साहेबांनी आपल्या अधिनस्त काही बीट जमादारांना वेसण घालणे अत्यावश्यक झाले आहे.
कोणत्या बीटवरून चर्चा?
अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत देऊळगाव घुबे आणि मेरा खुर्द हे दोन बीट सध्या चर्चेत आहेत. या बीटवर हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले काहीजण ठाणेदाराच्या ऐटीत वावरणारे असल्याची चर्चा आहे. बीट मिळवण्यासाठीच पोलिसांमध्ये स्पर्धा असते, हे नागरिकांना माहीत आहेच. पण बीट हातात आल्यावर ते नीट सांभाळणे हीदेखील जबाबदारी आहे. मात्र प्रत्यक्षात घडते उलटेच.
अवैध दारूला छुपे पाठबळ?
गावागावात अवैध दारूचा प्रचंड सुळसुळाट सुरू आहे. अनेक कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या दारूचा बंदोबस्त करण्याऐवजी, बीट जमादारच दारू विक्रेत्यांना छुपे पाठबळ देत असल्याची चर्चा नागरिकांत आहे. एवढेच नव्हे तर हे कर्मचारी ठाणेदारांची दिशाभूल करत असल्याच्याही आरोपांना उधाण आले आहे.
डिप्टी सीएम को प्रोटोकॉल समझाने वाली अंजना कृष्णा का जीवन परिचय
ठाणेदारांसमोर मोठे आव्हान!
अंढेरा पोलीस स्टेशनची सकारात्मक प्रतिमा राखण्यासाठी ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी या बीट जमादारांना वेसण घालणे आता गरजेचे झाले आहे. अन्यथा, काहींच्या चुकीच्या वागणुकीमुळे संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे राहू शकते, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.
“सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे उच्चाटन” या ब्रीदवाक्याशी प्रामाणिक राहून काही कर्मचाऱ्यांना वठणीवर आणणे हीच आता काळाची गरज आहे.