चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) शहराला भ्रष्टाचार आणि भीतीच्या राजकारणात अडकवून ठेवणाऱ्यांना जनता या निवडणुकीत ठाम उत्तर देणार आहे.चिखलीचा पुढील शाश्वत विकास, नागरिकांचे सुरक्षित व पारदर्शक प्रशासन आणि शहराची प्रगती, या सर्वांची हमी देणारे नेतृत्व म्हणजे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशिनाथ आप्पा बोंद्रे होय. अशा सक्षम नेतृत्वाला आणि मविआच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.
शुक्रवार 28 नोव्हेंबर रोजी सकाळी डॉ. शिंगणे यांनी श्री शनिदेव मंदिरात दर्शन घेऊन चिखली शहरात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते डॉ. शिंगणे यांच्या दमदार उपस्थितीने आणि थेट आवाहनाने चिखलीतील निवडणूक समीकरणे अधिकच स्पष्ट झाली आहेत.
डॉ. शिंगणे म्हणाले की, मविआचे उमेदवार हे विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवतात आणि सर्वसमावेशक, नियोजनबद्ध शहर उभारण्याची क्षमता त्यांच्या टीममध्ये आहे.नागरिकांमध्ये काशिनाथ आप्पांच्या शांत, स्वच्छ आणि अभ्यासू नेतृत्वशैलीबद्दल मोठा विश्वास निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले. सभेला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून चिखलीत मविआचा जोर वाढत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
काशिनाथ आप्पा हे दयावान व्यक्तिमत्व : डॉ. राजेंद्र शिंगणे
महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशिनाथ आप्पा बोंद्रे हे केवळ स्वच्छ चरित्राचे नेते नाहीत, तर दयावान आणि माणुसकीचा हात नेहमी पुढे करणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची खास ओळख आहे. शहरातील प्रत्येक घटकाचा सलोखा, गरजूंच्या मदतीसाठी तत्परता, आणि प्रशासनात पारदर्शकता राखण्याची त्यांच्या कार्यशैलीतील बांधिलकी आहे. यामुळे चिखलीत त्यांच्या नावाला वेगळा मान आहे. नागरिकांच्या सातत्याने अडचणी सोडवणे, रुग्णांना मदत, शैक्षणिक क्षेत्रातील मदत निधी, आपत्तीच्या काळात दिलासा… अशा अनेक कामांच्या माध्यमातून त्यांनी आपली दयाळू नेतृत्वशैली सिद्ध केली असल्याचे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.













