देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज)चोरट्यांनी आता देवालाही लुटायला सुरुवात केली आहे! शहरातील मंदिरांवर चोरट्यांनी एकाच रात्री धुमाकूळ घालत भाविकांच्या श्रद्धेलाच तडा दिला आहे.
शहरातील अहिंसा मार्गावरील प्राचीन चौंढेश्वरी मंदिरात घुसखोरी करत अज्ञात चोरट्यांनी लोखंडी जाळीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. देवीच्या मूर्तीवरील चांदीचा मुकुट, चांदीचा कंबरपट्टा, पंचधातूची देवी व बाळकृष्णाची मूर्ती, तसेच तीन ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र असा मौल्यवान ऐवज चोरून नेण्यात आला.
इतक्यावरच चोरट्यांचे समाधान झाले नाही. जुना जालना मार्गावरील पुरातन चतुर्शिगी देवी मंदिरात देखील जाळीचा दरवाजा तोडून ५०० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट व दानपेटी फोडून चोरट्यांनी डल्ला मारला.
याच परिसरातील मारुती मंदिरालाही चोरट्यांनी टार्गेट करत मूर्तीचे चांदीचे डोळे व दानपेटी चोरून नेली. एकाच रात्री तीन मंदिरांवर चोरी झाल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे.
दरम्यान, चोरीचा उलगडा करून आरोपींना लवकरच जेरबंद करू, असे पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांनी सांगितले आहे. मात्र, मंदिरांची सुरक्षा रामभरोसे असल्याने नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे











