जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज)शहरात पैशाच्या लोभापोटी एका मुलाने स्वतःच्या जिवंत आईला कागदोपत्री मृत दाखवून तिच्या खात्यातील १० लाख रुपये काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.पालिकेचे वीज अभियंता सुनील देविदास निकाळजे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, प्रेमसिंग कमलसिंग राजपूत या व्यक्तीने खोटे व बनावट स्वयंघोषणा पत्र सादर करून आईचा मृत्यू झाल्याचे दाखवले. या बनावट मृत्युपत्राच्या आधारे त्याने आईच्या मुदत ठेव खात्यातील १० लाख रुपये काढले.हा प्रकार संबंधित महिला जिवंत असल्याचे समोर आल्यानंतर उघड झाला. जिवंत असतानाही मला मी जिवंत आहे हे सगळ्यांना सांगावे लागत आहे, अशी व्यथा पीडित महिलेने व्यक्त केली आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.या तक्रारीवरून १५ डिसेंबर रोजी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे व त्यांची टीम करत आहे.
by Admin
Published On: December 17, 2025 10:55 am












