मोताळा :-(बुलडाणा कव्हरेज न्यूज)वडगाव खंडोपंत येथे एका ५० वर्षीय शेतकऱ्याने सततच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना १८ नोव्हेंबर रोजी समोर आली असून या प्रकरणात दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र संताजी शेळके यांना त्यांच्या पत्नीच्या चुलतभावांकडून—अमोल राजाराम सरोदे आणि गणेश राजाराम सरोदे (दोन्ही रा. फुली)—सतत मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता.
१६ नोव्हेंबर रोजी शेतीच्या कारणावरून वाद वाढला. या वेळी आरोपींनी रवींद्र शेळके आणि त्यांची पत्नी अलका शेळके यांना शिवीगाळ केली. अमोल सरोदेने काठीने मारहाण केली, तर दोघांनी मिळून “जगण्यात काही अर्थ नाही” अशा अपमानास्पद शिव्या देत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.
या सततच्या त्रासामुळे मानसिक ताण वाढल्याने रवींद्र शेळके यांनी वडगाव खंडोपंत शिवारातील नळगंगा नदीपात्राजवळील सरकारी विहिरीकाठी विष प्राशन केले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मृतदेह आढळल्यानंतर संपूर्ण गावात खळबळ उडाली.
पत्नी अलका शेळके यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पुढील तपास बोराखेडी पोलीस करीत आहेत.












