अमडापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज)पत्नीला माहेरावरून आणण्याच्या विषयावरून लहान मुलाने आई-वडिलांना काठीने मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना १५ नोव्हेंबर रोजी धोत्रा भनगोजी येथे घडली. याप्रकरणी अमडापूर पोलिसांत आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.किसन बुडाजी सोनारे (वय ७०) हे पत्नी कौशल्या आणि मोठा मुलगा गणेशसोबत राहतात. त्यांचा धाकटा मुलगा शाम हा दारूच्या व्यसनामुळे विवाहानंतर घरापासून वेगळा आहे. तरीही तो वेळोवेळी घरी येऊन शिविगाळ व मारहाण करत असल्याची माहिती मिळाली.१४ नोव्हेंबर रोजी शाम घरी आला आणि त्याने आई कौशल्या यांना “माझी पत्नी फुल्नला माहेरून आणायला सोबत चल” असा आग्रह धरला. आईने नकार दिल्याने संतापलेल्या शामने घरातील लाकडाने आईवर हल्ला केला. हे पाहून त्यांना वाचवण्यासाठी धावून आलेल्या वडिलांना आणि भावालाही त्याने मारहाण केली.किसन सोनारे यांच्या तक्रारीवरून आरोपी शाम सोनारे याच्यावर अमडापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
पत्नीला माहेरून आणण्यावरून मुलाकडूनच आई-वडिलांना मारहाण..!














