देऊळगाव राजा नगरपरिषदेच्या सत्तेसाठी एकेकाळचे कट्टर विरोधक एकत्र; डॉ. शिंगणे–डॉ. खेडेकर यांची ‘नगर विकास आघाडी’ स्थापन, भाजप–राष्ट्रवादी (अजित पवार गट) ला मोठा धक्का..!

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) – देऊळगाव राजा नगरपरिषदेच्या निवडणुकीत शहरातील राजकीय समीकरणांना मोठा कलाटणी देणारी घटना घडली आहे. सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील एकेकाळचे कट्टर विरोधक आणि प्रत्येक निवडणुकीत आमने-सामने उभे ठाकलेले माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे आणि डॉ. शशिकांत खेडेकर हे दोघे आता एकाच व्यासपीठावर आले आहेत.भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या राजकीय वाढीस शह देण्यासाठी आणि शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी दोन्ही माजी आमदारांनी ‘नगर विकास आघाडी’ स्थापन केली असून, याबाबतची माहिती १६ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. शिंगणे व डॉ. खेडेकर म्हणाले की, “बालाजी नगरीचा सर्वांगीण विकास आणि सर्व समाजघटकांना नेतृत्वाची संधी मिळावी यासाठी नगर विकास आघाडी काम करणार आहे.”दरम्यान, देऊळगाव राजा नगरपरिषदेच्या निवडणुका जवळ आल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. कोणता पक्ष कोणासोबत जाणार, कोणती आघाडी तयार होणार, यावर शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीचे प्रमुख नेते जिल्ह्यात एकत्र लढण्याची भूमिका मांडत होते. त्यामुळे देऊळगाव राजातही त्याच धर्तीवर राजकीय चित्र राहील, अशी जनतेत अपेक्षा होती.मात्र या सर्व चर्चांना छेद देत सिंदखेड राजा मतदारसंघातील दोन प्रमुख नेते—राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे डॉ. राजेंद्र शिंगणे आणि शिवसेना (शिंदे गट) चे डॉ. शशिकांत खेडेकर—शहराच्या विकासाच्या भूमिकेतून हातमिळवणी करत एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे युवा आमदार मनोज कायंदे यांना थेट राजकीय आव्हान देण्यासाठी दोन्ही माजी आमदारांनी ‘नगर विकास आघाडी’च्या माध्यमातून एका मंचावर येत नवीन समीकरणे निर्माण केली आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!