मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) :बुलढाणा रोडवरील वाकोडी ग्रामपंचायत हद्दीतील गोकुलधाम परिसरात एका क्षुल्लक वादातून धक्कादायक घटना घडली आहे. एका २९ वर्षीय युवकाने २५ वर्षीय तरुणीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला आणि त्यानंतर स्वतःच्या मानेवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना ११ नोव्हेंबर रोजी घडली असून, मलकापूर शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जान्हवी रवींद्र साळी (वय २५, रा. गोकुलधाम परिसर) ही आपल्या घरासमोर उभी असताना शुभम विलास झनके (वय २९, रा. यशोधाम परिसर, मलकापूर) याच्याशी काही किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद वाढताच शुभमने संतापाच्या भरात चाकूने जान्हवीच्या मानेवर वार केला.जान्हवीच्या आरडाओरडीनंतर तिची बहिण आणि शेजारी तात्काळ घटनास्थळी धावून आले आणि तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. हल्ल्यानंतर शुभमनेही स्वतःच्या मानेवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. जान्हवीची बहिण रोशनी रवींद्र साळी हिने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शुभम विलास झनके याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०९(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











