अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :तालुक्यात दोन स्वतंत्र अपघात घडून दोघे गंभीर जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एकीकडे सासुरवाडीकडे मुलाला बघण्यासाठी जात असताना मोटारसायकलला रोही जनावराने दिलेल्या धडकेत तरुण गंभीर जखमी झाला, तर दुसऱ्या घटनेत भरधाव मोटारसायकलस्वाराने पादचाऱ्याला जोरदार धडक देत फरार झाल्याने आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे.पहिली घटना : रोही जनावराने दिली जोरदार धडक…देऊळगाव मही येथील रहिवासी अविनाश भास्कर मोरे हे ८ नोव्हेंबरच्या रात्री सासुरवाडी इसोली येथे मुलाला भेटण्यासाठी स्वतःच्या मोटारसायकलने जात होते.इसोली गावालगत रस्ता ओलांडत असताना अचानक रोही जनावराने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत मोरे रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले.घटनास्थळी आलेल्या नातेवाईकांनी तत्काळ त्यांना संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.दुसरी घटना : भरधाव मोटारसायकलस्वाराने दिली धडक…अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील कोनड खुर्द येथे दुसरी घटना घडली.स्थानिक समाधान बबन वानखेडे (वय २६) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे वडील देऊळगाव घुबे ते कोनड खुर्द रस्त्याने घराकडे येत असताना, पुलाजवळून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात मोटारसायकलस्वाराने समोरून जोरदार धडक दिली आणि घटनास्थळावरून पसार झाला.या अपघातात वानखेडे यांचे वडील गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमदारांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम २८१, १२५(ए), आणि १२५ बीएनएस नुसार गुन्हा दाखल केला आहे.दोन्ही घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघे गंभीर जखमी; इसोली आणि कोनड खुर्द परिसरात भीषण घटना..! जनावर व मोटारसायकलस्वार धडकून अपघात!














